पणजी : ‘थॉमस कूक’ ही सर्वात जुनी टुरिस्ट ट्रॅव्हल कंपनी बंद पडल्याने त्याचा मोठा फटका गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला बसणार आहे. गेली २५ ते ३0 वर्षे ही ट्रॅव्हल कंपनी ब्रिटिश पर्यटकांना गोव्यात आणत होती. गोव्याला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटिश पाहुण्यांचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक पर्यटक रशियातून येत असतात. ‘थॉमस कूक’ बंद पडल्याने हा गोव्याच्या पर्यटनाला मोठा आघात आहे.
टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले की, ‘थॉमस कूक’ दर आठवड्याला सात चार्टर विमानांमधून कमीच ते २१00 ब्रिटीश पर्यटक गोव्यात आणत होती. पर्यटन व्यावसायिकांना हा सर्वात मोठा फटका आहे. केवळ हॉटेलमालकच नव्हे तर शॅकवाले, टॅक्सीवाले अशा सर्वच घटकांना याचा जबर आर्थिक फटका बसणार आहे.’
मेशियस पुढे म्हणाले की, ‘ ब्रिटिश पर्यटकांचे गोव्यात सरासरी १४ रात्री गोव्यात वास्तव्य असते. ब्रिटिश पर्यटक भारतात आले की, एकाच ठिकाणी किंवा एकाच हॉटेलात राहतात. खरा आनंद लुटण्यासाठी येणारे हे पर्यटक रिलॅक्स मूडमध्ये आपली सुट्टी येथे मजेत घालवत असतात आणि मोठ्या प्रमाणात ते खर्चही करीत असतात त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना याचा बराच लाभ होत असतो. हे उत्पन्न बुडणार आहे.’
२0१८ साली १ लाख ४८ हजार ब्रिटिश पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांमध्ये ब्रिटीश पर्यटक प्रिय आहेत. ब्रिटिश पर्यटक १४ ते २१ दिवस गोव्यात राहतात. काहीवेळा त्यांचे वास्तव्य ७ दिवस असते परंतु अन्य देशांच्या पर्यटकांप्रमाणे ते घाईघाईने किंवा लवकर गोव्याची सहल आटोपत नाही. ब्रिटनमध्ये हिंवाळा असतो तेव्हा ब्रिटिश पर्यटक येथे भेट देत असतात.
मेशियस म्हणाले की,‘ या पर्यटकांसाठी अनेक हॉटेलांच्या खोल्यांचे आरक्षण थॉमस कूक करीत होती. ३0 वर्षात या कंपनीने आपली पत सांभाळून ठेवली होती. विमान भाडे, हॉटेल, गोवा फिरण्यासाठी वाहन व्यवस्था असे सर्व पॅकेज ही कंपनी देत असे. गेल्या दोन वर्षात जागतिक मंदीमुळे आधीच विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यात भर म्हणून ‘थॉमस कूक’ ही १७८ वर्षे जुनी ट्रॅव्हल कंपनी कोलमडल्याने गोव्याच्या पर्यटन व्यवसायासाठी तो फार मोठा आघात आहे.
शॅक मालकांनाही चिंता अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनीही चिंता व्यक्त करताना गोव्याच्या पर्यटनावर हा फार मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘गोव्याला नेहमी भेट देणाºया आपल्या ओळखीच्या किमान पाच ब्रिटीश पर्यटकांनी बुकींग रद्द केले असल्याचे संदेश पाठवले. येत्या हंगामात १0 हजार ब्रिटीश पर्यटक जरी घटले तरी तो पर्यटन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका ठरणार आहे. शॅक उभारण्याबाबत आधीच अनेक अडथळे आहेत. सीझेडएमपी तयार झाल्याशिवाय शॅक धोरण राबवू नका, असा आदेश हरित लवादाने दिलेला आहे. या गर्तेत असताना हे नवीन संकट कोसळले.’दरम्यान, शॅकमालक संघटनेने हरित लवादाच्या आदेशास आव्हान देणारी जी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली आहे त्यावर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.