पणजी - गोव्यात खूप चर्चेत असलेल्या ट्रॅफिक सेंटिनल योजनेत यापुढे लवकरच सरकार काही सुधारणा करणार असे अपेक्षित आहे. वाहतूक खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारने समिती नेमून योजनेचा आढावा घेण्याचे ठरविल्याने आता योजनेत सुधारणा होतील, असे अनेक आमदार व अन्य राजकारण्यांना वाटू लागले आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनाही तसेच वाटते.
ट्रॅफिक सेंटिनल योजना ही माजी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या पुढाकाराने सुरू झाली होती. ती अजून अंमलात आहे पण ही योजना काही तरतुदींमुळे वादग्रस्तही ठरली. पोलिसांच्या मते या योजनेमुळे गोव्यात वाहन अपघातांची संख्या घटली व 71 व्यक्तींचे प्राण वाचविण्यात या योजनेमुळे यश आले. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही या योजनेचे समर्थन केले आहे पण योजनेत काही सुधारणा करण्याचे संकेतही मंत्री ढवळीकर यांनी दिले आहेत. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री या संघटनेनेही यापूर्वी जाहीरपणे ट्रॅफिक सेंटिनल योजनेचे स्वागत केलेले आहे.
मात्र गोव्याचे आमदार मायकल लोबो व अन्य काही राजकारण्यांनी सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे. काही आमदारांनी तर टीकाही केली. ट्रॅफिक सेंटिनल या योजनेचा काहीजण गैरफायदा घेतात व कुणाचेही फोटो मोबाईलवर काढून पोलीस खात्याला पाठवतात. किनारपट्टी भागात पर्यटन व्यवसाय वाढलेला असून तिथे मुलींचे देखील फोटो काहीजण काढतात व मग त्या फोटोंचा गैरवापर होतो, असा मुद्दा आमदार लोबो यांनी मांडला होता. लोबो हे स्वत: हॉटेल व्यवसायिक आहेत.
ट्रॅफिक सेंटिनल योजनेद्वारे अनेक लोक सेंटीनल्स झालेले आहेत. कुठेही वाहतूक नियमाचा भंग करताना कुणी दिसला तर मोबाईलवर ते टीपले जाते व पोलिसांना फोटो पाठविला जातो. पोलिस मग दंड ठोठावतात. आपला फोटो काढला म्हणून जाब विचारत वाहनधारकांनी ट्रॅफिक सेंटिनलला मारहाण केल्याचीही उदाहरणे काही गावांमध्ये आहेत. यामुळेच या योजनेत काही सुधारणा केल्या जाव्या अशा प्रकारचा आग्रह लोकांनीही धरला आहे.