पणजी : मंत्री विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन त्या पक्षातून काही महिन्यांपूर्वी बाहेर पडलेले ट्रोजन डिमेलो हे गुरुवारी (14 फेब्रुवारी)संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्षात फेरप्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी डिमेलो यांना काँग्रेसमध्ये फेरप्रवेश देण्यासाठी मान्यता दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी काँग्रेसच्या श्रेष्ठींसोबत चर्चा केली. चोडणकर हे गेले दोन दिवस दिल्लीत होते. डिमेलो यांचा काँग्रेसमध्ये फेरप्रवेश निश्चित झाला आहे. चोडणकर यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित केली असून त्यावेळी डिमेलो यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचा अर्ज भरून घेतला जाईल. डिमेलो यांना लोकमतने याविषयी विचारले असता, त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला.
डिमेलो यांनी 2002 साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसमध्ये यापूर्वी त्यांनी दोनवेळा काम केलेले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांच्याशी त्यांचे मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व ते गोवा फॉरवर्ड पक्षात गेले होते. गोवा फॉरवर्डमध्ये त्यांनी बंड पुकारून खळबळ उडवून दिली होती. डिमेलो यांनी अलिकडेच उच्च न्यायालयात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याच्या स्थितीवरून याचिका सादर केली होती.
ती याचिकाही राष्ट्रीय स्तरापर्यंत गाजली. डिमेलो यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मुख्य प्रवक्ते म्हणून यापूर्वी काम केले आहे. स्वर्गीय डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या राजकीय सक्रियतेच्या काळात आणि मुख्यमंत्रिपदाच्या काळातही डिमेलो यांनी 14 वर्षे डिसोझा यांच्यासोबत काम केले. लोकांचो आधार या एनजीओशीही ते अनेक वर्षे निगडीत राहिले. त्यांनी यापूर्वी माजी मंत्री दिलीप परुळेकर आणि इतरांविरुद्ध जमीन व्यवहार प्रकरणी आवाज उठवून कायद्याची लढाई लढली.