- नारायण गावस
पणजी - राज्यात आज आणि उद्या मंगळवारी तापमान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर राज्यात पुढील आठवड्यात तुरळक पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्यात उद्या मतदान हाेणार आहे. पण गेल्या आठवड्याच्या तुलनेत यंदा तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. उद्या तापमान ३३ ते ३४ अंश दरम्यान असणार आहे. त्यामुळे लाेक मतदान करण्यासाठी सकाळी जाऊन मतदान करु शकतात. दुपारी ११ ते सायं ३ पर्यंत उष्णतेचा पारा हा वाढेलला असतो. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना बाहेर जाणे धाेकादायक ठरु शकते. पुढील दोन दिवस हे तापमान असेच उष्ण आणि दमट राहणार आहे. तर ९ मे ते १२ मे पर्यंत राज्यात काही भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्यानुसार मागील आठवड्यापेक्षा यंदा तापमान १ ते २ अंशानी घटले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी कमाल तापमान ३३ ते ३३.६ अंश सेल्सिअस दरम्यान होते. सोमवारी मुरगाव येथे कमाल ३३.६ अंश तर किमान २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पणजीतील कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस झाले होते. तर पणजीतील किमान तापमान २७ अंश सेल्सिअस झाले होते. हवामान खात्याने राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.