लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : समान नागरी संहिता कायदा पाळणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. गोव्यात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने राहतात. पर्यटनासह समान नागरी संहिता पाळणारे राज्य म्हणूनही गोवा प्रसिद्ध आहे. इतर राज्यांनी या कायद्याचे पालन करायला सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राज्यात स्थायिक ओडिशातील लोकांनी पणजी येथे ओडिशा उत्कल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर व चारुदत्त पानीग्रही, राकेश अगरवाल व इतर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जात धर्म भाषेमुळे आम्ही कुणालाही वेगळे ठरवू शकत नाहीत. गोव्यात ओडिशातील अनेक लोक स्थायिक झाले आहेत. त्यांनाही राज्य सरकार चांगल्या सुविधा देत आहे. तेही या देशाचे नागरिक आहेत. विकसित भारत घडविण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा असेल. ओडिशाच्या लोकांसाठी गोव्यात आपा चित्रपट प्रसिद्ध करण्यासाठी आपण गोवा मनोरंजन संस्थेला सांगून मदत करणार आहे. ते म्हणाले, गोव्याप्रमाणे ओडिशाच्या लोकांनाही फिशकरी राइस महत्त्वाचा आहे. दोन्ही राज्यात समुद्रकिनारा आहे, असे यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
जगन्नाथाच्या कृपेने : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की जगन्नाथाच्या कृपेने सहा वर्षे मुख्यमंत्री आहे. प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ओढण्यासाठी बोलावले जाते. मी सभापती असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आरोग्य चांगले नव्हते, त्यावेळी हा मान मला मिळाला होता. नंतर दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री झालो. तेव्हापासून सलग सहा वर्षे मुख्यमंत्रिपदावर आहे, ही जगन्नाथाची कृपा आहे.
एक भारत, श्रेष्ठ भारत' : नाईक
एक भारत, श्रेष्ठ भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यात अनेक वर्षे ओडिशाचे लोक आनंदात राहत आहेत. त्यांनी भाजपला मतदानास सहकार्य करावे.