पणजी : गोवा विद्यापीठात विद्यार्थी कार्यकारी मंडळाच्या खुल्या निवडणुका घेण्यावर शिक्कमोर्तब झाले होते. मात्र सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याला विरोध दर्शविल्याने अशा पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. या सर्व प्रक्रियेमुळेच यंदा विद्यापीठाच्या निवडणुकांची तारखाही उशिराने जाहीर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विद्यापीठात विद्यार्थी कार्यकारी मंडळाच्या निवडणुका घेतल्या जातात. महाविद्यालयात घेतल्या जाणा-या निवडणुकांमध्ये निवडलेले विद्यार्थ्यांनाच विद्यापीठ निवडणुकांसाठी मतदान करण्याचा अधिकार असतो. जे विद्यार्थी मतदान करणार आहेत, त्याची पूर्वकल्पना असल्याने विद्यापीठात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढतो आणि निवडणुकीच्या काळात गोंधळ निर्माण होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना धमकावणे आणि अपहरणाचे प्रकार घडतात. त्यामुळे विद्यापीठात खुल्या निवडणुकां घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी विद्यार्थी व काही राजकीय पक्षांकडून केली जात होती.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या या प्रस्तावावर विचार केला आणि राज्यपालांच्या मंजुरीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. या निवडणुका विद्यापीठात न घेता दरवर्षी विविध महाविद्यालयांमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र महाविद्यालयांतील प्राचार्यांनी खुल्या निवडणुका घेण्यास विरोध दर्शविला. निवडणुकांवेळी विद्यापीठात गोंधळ व अराजकता निर्माण होते. तसेच काहीसे चित्र महाविद्यालयांमध्ये निर्माण होईल, अशी सबब प्राचार्यांनी देत याला विरोध केला. त्यामुळे या निवडणुकां पूर्वीप्रमाणेच विद्यापीठात घेतल्या जात आहेत.
दरम्यान, विद्यापीठाच्या या निवडणुकांना एनएसयुआय व शिवसेना या विद्यार्थी संघटनेने जाहीरपणे विरोध दर्शविला आहे. गोवा विद्यापीठ हे भाजप संघटनेला पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यंदाची निवडणुका रद्द करून पुढच्या वर्षीच निवडणुकां घेण्याची मागणी त्यांनी केली होती.