-नारायण गावस पणजी - गोवा फलोत्पादन मंडळातर्फे आता शेतकऱ्याकडून रानभाजी खरेदी केली जाणार असून ही रानभाजी आता फलाेत्पादनाच्या दालनावर ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. यात ताळकीळा, तेरे, अळू तसेच इतर रानभाज्याचा समावेश असणार आहे अशी माहिती फलाेत्पादन मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली.
सभापती रमेश तवडकर यांनी हा संकल्प मांडला होता. रानभाज्या या आरोग्यास चांगल्या आहे. पण त्या लोकांना सहज मिळत नाही. शहरी लाेकांना या भाज्या मिळत नाही. ग्रामिण लाेकांना गावात उपलब्ध असतात. त्यामुळे हंगामी येणाऱ्या भाज्या शेतकऱ्यांकडून फलोत्पादन मंडळाने घेऊन त्या ग्राहकांसाठी उपलब्ध कराव्या अशी मागणी केली होती. त्यामुळे आम्ही आता सर्व शेतकऱ्यांना आव्हान करणार आहोत. शेतकऱ्यांकडून रानभाज्या घेतल्या जाणार असून त्यांना त्या बदल्यात याेग्य असा मोबदलाही दिला जाणार आहे. यामुळे शेतकरीही बळकट होणार आहे, असेही आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
भाज्यांच्या विक्रीत वाढराज्यात फलोत्पादन मंडळातून चांगल्या दजार्च्या भाजी कमी दरात मिळत असल्याने भाजी खरेदीचा दर्जा वाढला आहे. फलोत्पादन मंडळ प्रतिदिन १४० टन भाजीची विक्री करत असते. काही फलाेत्पादन दालनावर प्रती दिन १ लाख पर्यतची भाजी विक्री होत आहे. लाेकांनी फलोत्पादन मंडळावर विश्वास ठेवला असल्याने या दालनावर विक्री वाढली आहे, असेही आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.