पणजी : येत्या गोवा मुक्तीदिनापर्यंत म्हणजेच १९ डिसेंबरपर्यंत गोवा शंभर टक्के साक्षर होईल, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. मुख्यमंत्र्यांहस्ते समग्र शिक्षा अभियानसाठी विद्यार्थ्यांकरिता 'किलबिल' पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
सावंत म्हणाले की, 'सध्या राज्यात ९८ टक्के साक्षरता असून पुढील पाच महिन्यात शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ण करू.' ते म्हणाले की, 'ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील निरक्षरांची यादी शिक्षण खात्याला सादर करावी. त्यानंतर या लोकांना साक्षर करण्याची मोहीम राबवली जाईल.'
मुख्यमंत्री म्हणाले की,' आमच्या स्वयंसेवकांनी सुमारे ३ हजार निरक्षरांना लिहायला व वाचायला शिकवून त्यांची परीक्षाही घेतली. त्यात ७०० जण उत्तीर्ण झाले. उर्वरित २,३०० जणांची परीक्षा येत्या १४ रोजी होणार आहे. सांगे, केपें व काणकोण तालुक्यांमध्ये निरक्षरांचा शोध घेतला जात आहे. तेथेही स्थानिक ग्रामपंचायतींना निर्देश दिलेले आहेत. निरक्षरांची यादी मिळाल्यानंतर पुढील पाच महिन्यात त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनाही कोकणी, मराठी किंवा त्यांना हवी ती भाषा लिहायला, वाचायला शिकवून साक्षर केले जाईल. येत्या १९ डिसेंबरपर्यंत गोवा राज्य शंभर टक्के साक्षर घोषित करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. पत्रकार परिषदेस शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर व शिक्षण संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते.
आधीच्या काँग्रेसी नेत्यांनी म्हादई कशी विकली हे आधी तपासा
दरम्यान, 'म्हादईच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांनी म्हादईबाबत सरकारवर टीका करण्यापेक्षा त्यांच्या आधीच्या काँग्रेसी नेत्यांनी म्हादई कशी विकली याचा अभ्यास करावा. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रवाह प्राधिकरणाचे अधिकारी सध्या म्हादई खोऱ्यात तपासणी करत आहेत . यामुळे कर्नाटकचे पितळ उघड पडेल.'