पणजी : गोवा मुक्तीला यापुढे साठ वर्षे पूर्ण होत आहेत. येत्या दि. १९ डिसेंबरपासून वर्षभर गोवा सरकार मुक्ती दिनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. देशाच्या प्रत्येक मुख्य शहरात मुक्ती दिनाचा एक तरी कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. केंद्र सरकारकडे यासाठी शंभर कोटींचा निधी गोव्याने मागितला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एका कार्यक्रमासाठी गोव्यात निमंत्रित केले जाईल असे सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. गोवा मुक्ती दिन सोहळ्याच्या सर्व कार्यक्रमांचा समन्वय, नियोजन व देखरेख या कामासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली गेली आहे. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री, सभापती, विरोधी आमदार, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समितीत समावेश आहे.
गोव्याची सांस्कृतिक परंपरा, पुरातन व सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती आणि गोव्याचे पर्यटन हे सगळे देशासमोर मांडण्याची संधी विविध कार्यक्रमांद्वारे वर्षभर घेतली जाईल. गोव्याचे क्रिडा, साहित्य, गोवा मुक्ती संग्राम याच्याशीनिगडीतही कार्यक्रम होतील. येत्या १९ रोजी सकाळी मुक्तीदिन सोहळा झाल्यानंतर सायंकाळी आझाद मैदानावर गोव्याच्या सांस्कृतिक वैभवावर आधारित कार्यक्रम होईल. त्यानंतर वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. लोकांचा त्यासाठी सहभाग हवा आहे.
लोकांनी कार्यक्रम सूचवावेत. केंद्र सरकार निधी देणारच आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या एका तरी महत्त्वाच्या शहरात आम्ही कार्यक्रम आयोजित करू. यामुळे गोव्याचे पर्यटन, खाद्य संस्कृती व एकूणच सांस्कृतिक पर्यटन हे देशासमोर व जगासमोरही मांडले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यांमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत, ज्यांनी गोवा मुक्तीसाठी साठ वर्षांपूर्वी योगदान दिलेले आहे. त्यांचे सत्कार केले जातील. जे हयात नाहीत, त्यांच्या कुटूंबियांचा गौरव केला जाईल. प्रत्येकाच्या कामाची दखल घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.