- किशोर कुबल पणजी - शॅक धोरणातील काही तरतुदींना आक्षेप घेत व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन-तीन दिवसात संबंधित घटकांची बैठक घेऊन तोडगा काढीन, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे.
गोव्याच्या किनाय्रांवर पर्यटक हंगामात थाटले जाणारे शॅक देश, विदेशी पर्यटकांचे मोठे आकर्षण असते. पर्यटक हंगाम १ ॲाक्टोबरपासून सुरु होत आहे. शॅक व्यावसायिकांनी आमदार मायकल लोबो यांचीही भेट घेतली. नव्या धोरणात सुरक्षा ठेव ५० हजार रुपयांवरुन वाढवून २ लाख रुपये करण्यात आली आहे. शॅकसाठी पोलाद वापरु नये. लाकडाचाच वापर करावा आदी अटी असून सांडपाण्याच्या बाबतीतही कडक नियम केले आहेत. अनुभवी व्यावसायिकांच्या बाबतीत जे निकष लावले आहेत तेही व्यावसायिकांना मान्य नाहीत. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असू नये, अशीही एक अट आहे.
शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष मान्युअल कार्दोझ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही सर्व अडचणी मुख्यमंत्र्यांना विषद केल्या आहेत. डिपॉझिट रकमेत केलेली वाढ अन्याय्य आहे. अनुभवींच्या बाबतीत नवीन निकळ लावला आहे तो म्हणजे प्रत्येकी तीन वर्षांचे तीन वेळा परवाने मिळालेल्या व्यावसायिकालाच अनुभव म्हणून गृहित धरले जाईल., हे योग्य नव्हे. तीन वर्षांचा एकदा जरी परवाना मिळाला असेल तर त्या शॅक व्यावसायिकाची गणना अनुभवींमध्ये केली जावी व ९० टक्के वर्गवारीत त्याचा समावेश करावा. या व्यवसायात नवीन प्रवेश करु पाहणाय्रांना १० टक्के राखिव ठेवण्यास हरकत नाही.’
कार्दोझ पुढे म्हणाले कि, नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे. परंतु त्याचबरोबरच कित्येक वर्षे या व्यवसायात असलेल्यांवरही अन्याय होता कामा नये.’