पणजी : गोव्यात भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून काहीच बिघडणार नाही. यापूर्वीही इतर पक्षांचे सरकार या राज्यात होते, तेव्हाही काही बिघडले नव्हते आणि यापुढेही बिघडणार नाही, असे संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी स्थानिक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भाजपने सत्तेसाठी तत्त्वांशी सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपशिवाय गोव्याचे काही खरे नाही किंवा आता सत्ता मिळाली म्हणजे ते सांगतील ती पूर्व दिशा, अशी समजूत कुणी करून घेण्याची अजिबात गरज नाही. राज्याने यापूर्वीही अनेक राजवटी पाहिलेल्या आहेत. काँग्रेस व मगो राजवटही पाहिलेली आहे. तेव्हा भाजप नव्हता आणि तेव्हा काहीच बिघडले नव्हते, असे ते म्हणाले. गोव्यातील सर्वसाधारण ख्रिस्ती माणूस कोणत्याही चिथावण्यांना बळी न पडता आपल्या विवेकबुद्धीने मतदान करतो. भाजपने वेगळी भूमिका घेऊन ख्रिस्ती मतदारांना सामावून घेतले किंवा मॅनेज केले, असे जे चित्र उभे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. गोवा भाजपने या समाजाला मॅनेज केले असते, तर लोकसभा निवडणुकीत चर्चचा सल्ला ऐकून व फादर सेड्रिक प्रताप यांच्यासारख्यांचा प्रचार ऐकून लोकांनी भाजपविरोधात मते दिली असती; परंतु प्रचंड मतांनी दोन्हीही खासदार निवडून आले, त्याची आठवणही वेलिंगकर यांनी करून दिली. (प्रतिनिधी)
भाजपवाचून गोव्याचे काहीच अडणार नाही!
By admin | Published: May 03, 2016 1:56 AM