पणजी - सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून लवकर मुक्त झाला असता, असे उद्गार पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज गोवा भेटीवर आले असता काढले. गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीपूर्ती समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तथा मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीही, व्यासपीठावर उपस्थित होते.
मोदी म्हणाले, 'पोर्तुगीजांच्या जोखडाखाली शेकडो वर्षे राहूनही गोवा भारतीयत्व विसरला नाही किंवा भारतालाही गोव्याचे विस्मरण झाले नाही. संपूर्ण देश गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी उभा राहिला, येथील हुतात्मा स्मारके हे याचे प्रतीक आहेत. देशाच्या इतर भागांमध्ये मोगलांची सत्ता होती तेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीखाली आला. मुक्तीसाठी गोमंतकीयांनी असामान्य लढा दिला. 'गोव्याने पायाभूत सुविधांच्या बाबतीत बरीच भरारी मारली आहे. विकासाची ही गती कायम ठेवा. त्यासाठी संकल्प करा, गोव्याच्या सुवर्णमहोत्सवी मुक्ती वर्षात हे राज्य अधिक समृद्ध, संपन्न दिसले पाहिजे,' असेही मोदी म्हणाले.
पर्रीकरांचे स्मरण -माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे मोदी यांनी आपल्या भाषणात आवर्जून स्मरण केले. ते म्हणाले, गोव्याची प्रगती मी पाहतो तेव्हा पर्रीकर यांची आठवण होते. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते राज्यासाठी वावरले.
मुख्यमंत्र्यांचे कौतुकमोदीजी म्हणाले, शिक्षण तसेच अन्य क्षेत्रांमध्ये गोव्याने घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे. सर्वच बाबतीत गोवा पुढारले आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के पूर्ण केले. हर घर जल, अन्नसुरक्षा, शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये, हागणदारीमुक्त आदी सर्व क्षेत्रात गोव्याने शंभर टक्के उद्दिष्ट साधले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कौतुकास पात्र आहेत. त्याआधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या प्रगतीविषयी आपल्या भाषणातून सांगितले. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर मोदीजींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या कार्यक्रमात मोदीजींच्या हस्ते ६५० कोटी रुपये खर्चाच्या वेगवेगळ्या पाच प्रकल्पांचे उद्घाटन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून झाले. या प्रकल्पांमध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशलिटी ब्लॉक, ऐतिहासिक आग्वाद कारागृहाचे नूतनीकरण, नावेली येथील गॅस इन्सुलेटेड वीज प्रकल्प तसेच दक्षिण जिल्हा इस्पितळ आणि मोपा येथील हवाई कौशल्य विकास केंद्राचा समावेश आहे.