- पंकज शेट्ये वास्को - दोन तरुण ग्राहकाला गांजा अमली पदार्थ विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहीती मुरगाव पोलीसांना मिळताच त्यांनी सापळा रचून दोघांनाही ६५० ग्राम गांजासहीत रंगेहात पकडले. बायणा येथील एका सौचालयासमोर ते तरुण गुरूवारी (दि. १८) संध्याकाळी गांजा विकण्यासाठी घेऊन आले असता तेथेच त्यांना पोलीसांनी रंगेहात पकडले.
मुरगाव पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी संध्याकाळी ४.२० ते ६ च्या दरम्यान ती कारवाई करण्यात आली. दोन तरुण गांजा अमली पदार्थ घेऊन विकायला येणार असल्याची माहीती पोलीसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. माहीती मिळताच पोलीसांनी त्या तरुणांना गजाआड करण्यासाठी सापळा रचला. काही वेळाने तेथे आलेले दोन तरुण संशयास्पद असल्याचे दिसून येताच पोलीस उपनिरीक्षक उदय साळूंके आणि इतर पोलीसांनी छापा मारून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ६५० ग्राम गांजा आढळला. त्यानंतर पोलीसांनी त्यांच्याशी चौकशी केली असता गांजा घेऊन आलेल्या त्या तरुणांची नावे दयानंद बाबू लमाणी (वय २०, रा: मांगोरहील - वास्को) आणि मालेश रमेश चव्हाण (वय २६, रा: काटे बायणा) अशी असल्याचे उघड झाले. मुरगाव पोलीसांनी नंतर त्या दोन्ही तरुणांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. पोलीसांनी त्या तरुणांकडून जप्त केलेल्या गांजाची कीमत ६५ हजार रुपये असल्याची माहीती मिळाली. मुरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.