गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, काँग्रेसवर नामुष्की
By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 10:15 AM2020-12-15T10:15:59+5:302020-12-15T10:18:15+5:30
goa zp election results : सोमवारी जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे.
पणजी - एकीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे देशभरात भाजपाविरोधात असंतोष वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे विविध राज्यांत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी यश मिळत असल्याने भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. काल जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे. गोव्यातील दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४९ पैकी ३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडताना एका जागेवर विजय मिळवला.
गोव्यातील ४८ जिल्हा परिषद क्षेत्रात ५० जागा आहेत. मात्र एका ठिकाणी उमेदवाराचे निधन झाल्याने तिथे मतदान झाले नव्हते. जिल्हा परिषदेसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला. तर सात ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला चार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ आणि एनसीपी आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.
या निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रथमच खाते उघडले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष गोव्यामध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागांवर उमेदवार उभे करण्याचे लक्ष्य समोर ठेवून वाटचाल करत आहे. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत.
दरम्यान, गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या निकालांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ग्रामीण मतदारांनी भाजपाचे नेतृत्व आणि राज्य सरकारवर विश्वास दर्शवला आहे, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.