सुशांत कुंकळयेकर
मडगाव: गोव्यात अंमली पदार्थाचा व्यवसाय केवळ किनारपट्टी भागातच चालतो या कल्पनेला पूर्ण छेद देणारे चित्र गेल्या साडेआठ महिन्यात पुढे आले असून मडगाव आणि पणजीसारख्या शहरातच नव्हे तर फोंडा व वास्कोसारख्या उपनगरातही अंमलीपदार्थ खुलेआम मिळू लागले आहेत असे दिसून आले आहे. आतार्पयत गोव्यात मागच्या साडेआठ महिन्यात 108 अंमलीपदार्थ संदर्भातील प्रकरणो उघडकीस आली असून त्यापैकी 70 टक्के प्रकरणो ही बिगर किनारपट्टी भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे.सरसकट भाषेत गांजा आणि गदुल्र्याच्या भाषेत ज्याला ‘ग्रास’ म्हटले जाते अशा प्रकारची एकूण 73 प्रकरणो मागच्या साडेआठ महिन्यात वेगवेगळ्या पोलीस स्थानकात वर्ग झाली असून आतार्पयत पोलिसांनी तब्बल 37 लाखांचा गांजा पकडला आहे. आतार्पयत या ‘ग्रास’ ट्रेडमध्ये असलेल्या 85 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात 28 गोमंतकीय, 52 इतर भारतीय तर 5 विदेशी आरोपींचा समावेश आहे.
मागच्या साडेआठ महिन्यांच्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतल्यास मडगावचा रेल्वे स्थानक परिसर, पणजीतील उद्याने, फोंडय़ातील शैक्षणिक आस्थापने आणि औद्योगिक वसाहती तर वास्कोत रेल्वे स्थानक परिसर या भागातच अशाप्रकारचे गुन्हे जास्त नोंद झाले असून मडगावात अशाप्रकारचे एकूण 15, पणजीत 11 तर फोंडा व वास्को या पोलीस स्थानकाच्या कक्षेत एकूण प्रत्येकी सात घटनांची नोंद झाली आहे. कळंगूट पोलीस स्थानकाच्या कक्षेत सहा (ही फक्त गांजा संदर्भातील प्रकरणो असून त्यात सिंथेटीक ड्रग्सच्या प्रक़रणांची नोंद नाही). तर म्हापसा पोलीस स्थानकाच्या कक्षेत चार प्रकरणांची नोंद झाली आहे. औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या कुंकळ्ळी पोलीस स्थानकात तीन, फातोर्डा व कोलवा पोलीस स्थानकाच्या कक्षेत प्रत्येकी तीन, पेडणो, कुळे, काणकोण, वेर्णा, कुडचडे येथे प्रत्येकी दोन तर वाळपई, अंजुणा, ओल्ड गोवा व मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाच्या कक्षेत एका प्रकरणाची नोंद झाली आहे.
गोव्यातील या वाढत्या ड्रग्स व्यवसायाबद्दल चिंता व्यक्त करताना कुडचडेच्या न्यू एज्युकेशनल हायस्कूलचे व्यवस्थापक प्रदीप काकोडकर म्हणाले, हे अंमलीपदार्थ अगदी लोकांच्या घरार्पयत पोहोचले असून विद्यालयीन विद्यार्थी या व्यवसायाचे सॉफ्ट टार्गेट बनले आहेत. या अंमली पदार्थाच्या आहारी उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी जाऊ लागले आहेत. या ड्रग्स व्यावसायिकांना पोलिसांचाही आशिर्वाद असल्यामुळे सगळे काही बिनबोभाटपणो चालू असल्याचे ते म्हणाले.
फोंडय़ात ड्रग्सचा सुळसुळाटमोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक आस्थापने आणि औद्योगिक वसाहती असलेल्या फोंडय़ात मागच्या काही वर्षात या ड्रग्स व्यवसायाने आपली पाळेमुळे पसरावयाला सुरुवात झाली आहे. 8 जुलै रोजी फोंडा पोलिसांनी माश्रेल येथे धाड घालून संजय वर्मा या मध्य प्रदेशातील आरोपीला अटक केली असता त्याच्याकडे आठ लाखांचा गांजा सापडला होता. 24 जुलैला भोमा येथे पोलिसांनी दोन बिहारी युवकांना अटक केली असता त्यांच्याकडे 84 हजारांचा गांजा सापडला होता. साखळी येथे 18 ऑगस्ट रोजी अशाचप्रकारे रमेश चंद्रन या 28 वर्षीय ओरिसाच्या युवकाला अटक केली असता त्याच्यावर तब्बल सहा किलो (सहा लाख) गांजा सापडला होता.
कोलवाळ तुरुंगातही गांजाया गांजाच्या तावडीतून कोलवाळचा तुरुंगही सुटलेला नाही. 13 मार्च रोजी या तुरुंगाची झडटी घेतली असता एका जेल गार्डकडेच 10 हजाराचा गांजा सापडला होता. एकाच महिन्याने म्हणजे 9 एप्रिलला कोलवाळ तुरुंगात पुन्हा एकदा असा प्रकार घडला. यावेळी जेम्स संडे या नायजेरियनकडे 10 हजाराचा गांजा सापडला होता. 17 जुलै रोजी या तुरुंगातील बिघडलेला ग्राईंडर दुरुस्त करुन तो परत तुरुंगात आणताना हा ग्राईंडर घेऊन आलेल्या रिक्षा चालकाकडे चार हजाराचा गांजा सापडला होता.
चक्क लागवडगोव्यात या नशिली ग्रासला असलेली वाढती मागणी पाहून गोव्यात गांजाचे पिक घेण्याचेही प्रकार उघडकीस आले असून 11 एप्रिल रोजी कळंगूट येथे अशी गांजाची शेती करत असताना एका रशियन जोडप्याला अटक करुन त्यांच्याकडून तीन लाखांचा गांजा पकडला होता. 4 ऑगस्टला कळंगूट येथेच गांजाचे पीक घेत असल्याच्या आरोपाखाली आंतोनियो फर्नाडिस या स्थानिकाला अटक करण्यात आली होती. पणजीच्या कांपाल भागात असलेल्या झोपडपट्टीतही गांजाचा व्यवहार करत असल्यामुळे 19 जुलैला जी कारवाई केली होती त्यावेळी या झोपडपट्टीतील पाईपमध्ये गांजाच्या लपवून ठेवलेल्या 43 पुडय़ा जप्त केल्या होत्या. ताळगाव भागातही गांजाची प्रकरणो उघडकीस आली आहेत.