पणजी : गोव्यातील गवळी धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांना दिल्ली येथे भेटले. हा विषय केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडून धसास लावण्याचे आश्वासन मुंडा यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुंडा यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, सभापती राजेश पाटणेकर ,राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, समाज कल्याणमंत्री मिलिंद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, सल्लागार एन डी अगरवाल, डॉ. जानू झोरे, डॉ. राजन लांबोर, डॉ. शांताराम सुर्मे, बी. डी. मोटे, चंद्रकांत शिंदे यांचा समावेश होता.
गेली तीस वर्षे ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही, त्यामुळे धनगर समाजावर अन्याय झाला असल्याचे मुंडा यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शिष्टमंडळाने त्यांना या विषयी पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुंडा यांनाही हे पटलेले आहे. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हा विषय प्राधान्यक्रमाने मांडीन व हा विषय तसाच लावीन, अशी ग्वाही मुंडा यांनी शिष्टमंडळाला दिली. गोव्यातील धनगर समाज अनुसूचित जमातींमध्ये समावेशास पात्र आहे आणि हा समावेश अजून न झाल्याने मुंडा यांनीही खंत व्यक्त केली.