मडगाव: काजू फेणी प्रमाणेच माडाची फेणीही गोव्यात प्रसिद्ध . गोव्यातील पारंपरिक उद्योगामध्ये माडाच्या फेणी उद्योगाचा समावेश आहे. मात्र सध्या हे फेणीचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. माडाची सूर (नीरा) काढणारे रेंदेर दिवसेंदिवस कमी होतात हे त्यामागचे मुख्य कारण आहे. माडाच्या फेणीच्या उद्योगा संदर्भात गोवा विध्यापिठाच्या गोवा बिझिनेस स्कूल या संस्थेने जो अहवाल तयार केला आहे त्यात अनेक कारणा बरोबरच याही कारणाचा उल्लेख करण्यात आला आहे.
गोव्यात रेंदेर हा शब्दच परांपरिकतेशी जुळला आहे. अनेक लोक गीतातून या रेन्देरांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. दर दिवशी तीन वेळा माडावर चढून हे रेंदेर सूर काढतात. यावेळी ते गात असलेली गाणी गोव्यातील लोकवेदाचाच एक भाग झाली आहेत. पण माडावर चढण्याचा धोका लक्षात घेऊन नवीन तरुण या व्यवसायाकडे पाठ फिरवू लाघले आहेत. त्यामुळे गोव्यातील सर्वात जुना पारंपरिक व्यवसायच धोक्यात आला आहे.माडावर चढणारे रेंदेर ही कल्पना कित्येक कवींना स्फुरण देणारी असली तरी हे काम केवळ धोकदायकच नव्हे तर शरीरावर विपरीत परिणाम करणारेही आहे. माडावर चढताना गुढघ्यावर ताण येत असतो त्यामुळे कित्येकांचे गुढघे म्हातारपणात निकामी अथवा कमजोर होतात. एवढेच नव्हे तर पावसात माडावर निसरड होते. त्यामुळे घसरून पडण्याचाही धोका असतो. या पारंपरिक व्यवसायाला कुठले स्वरक्षण कवच नसल्यानेही हे काम करण्यास नवीन तरुण तयार नाहीत त्यामुळे सध्या गोव्यात रेन्देरांचा अक्षरशा तुटवडा भासतो. या सर्वाचा परिपाक फेणीच्या उत्पादनावर होऊ लागला आहे.
याशिवाय माडाच्या सूरीचा (निर्याचा) उपयोग दुसर्या कामासाठीही होऊ लाघला आहे. या सूरीपासुन माडचे गूळ तयार होते तसेच जेवणासाठी वापरल्या जाणार्या वीनेगरही तयार केली जाते. ह्या दोन्ही वस्तूंना बाजारात भरपूर मागणी असल्याने आणि त्यांचा उत्पादन खर्च फेणी तयार करण्यापेक्षा स्वस्त असल्याने उत्पादक फेणीकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्याचाही परिणाम फेणीवर होऊ लागला आहे.