पणजी : गेल्या 6 जून रोजी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. तथापि, आता चार महिन्यांतच सरकारने त्यांना पुन्हा सेवेत घेतले आहे.
शेट्ये यांची नियुक्ती मडगावमधील ईएसआय इस्पितळाच्या विशेष सेवा अधिकारीपदी करण्यात आली आहे. याविषयीचा आदेश सरकारच्या पर्सनल खात्याने गुरूवारी जारी केला आहे. ईएसआय इस्पितळ हे मजूर खात्याच्या अखत्यारीत येते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीला लाच प्रकरणी अटक होण्याची ती पहिलीच घटना होती. एका इसमाला स्फोटके साठवून ठेवण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी शेट्ये यांनी लाच मागितली होती. संबंधित इसमाने याविषयीची माहिती पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला दिल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून शेट्ये यांना पकडले होते. त्यावेळी राज्यात मोठी खळबळ माजली होती. तक्रारदाराने शेट्ये यांचे संभाषण असलेली सीडी पोलिसांना दिली होती.
लाच एकूण दीड लाखाची मागितली गेली होती व त्यापैकी पहिला हप्ता म्हणून शेट्ये यांनी 25 हजार रुपये घेतले होते, असा युक्तिवाद एसीबीने यापूर्वी केला होता. कोणत्याच अधिकाऱ्याला दीर्घकाळ निलंबित ठेवता येत नाही. शेट्ये याना तर चार महिन्यांच्या आत सरकारने पुन्हा सेवेत घेतले. त्याना अटक झाल्यानंतर पाच दिवसांनी सेवेतून निलंबित करण्यात आले होते.