पणजी - गोव्याचे प्रशासन पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखे झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 11 दिवस अमेरिकेत उपचारांसाठी राहून बुधवारी परतले व लगेच गुरुवारी दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने मुंबईला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण चार मंत्री सध्या दैनंदिन प्रशासकीय कामांपासून दूर असून सरकारमध्ये काय चाललेय ते कुणालाच कळेनासे झाले आहे.
मुख्यमंत्री पुन्हा आरोग्याच्या तपासणीसाठी मुंबईला रवाना झाल्याने भाजपच्या काही आमदारांनाही आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री पर्रीकर बुधवारी सायंकाळी अमेरिकेहून गोव्यात परतले तरी, गुरुवारी सकाळी ते पर्वरीतील मंत्रलयात आले नाही. गुरुवारी त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना मुंबईतील इस्पितळात उपचारांसाठी जावे लागले. मुख्यमंत्री उद्या शनिवारपर्यंत गोव्यात परतू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात मुंबईच्या खासगी इस्पितळातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मुख्यमंत्री पुढील निर्णय घेऊ शकतील.
मुख्यमंत्री गेल्या 10 रोजी अमेरिकेला गेले होते. दि. 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळ्य़ावेळी मुख्यमंत्री गोव्यात नव्हते व त्यामुळे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्य़ात ध्वजवंदन करण्यात आले होते. पर्रीकर दि. 18 ऑगस्टला गोव्यात पोहचतील असे प्रारंभी जाहीर करण्यात आले होते पण अमेरिकेत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तेथील वास्तव्य आणखी काही दिवसांनी वाढविणो भाग पडले होते. मुख्यमंत्री बुधवारी सायंकाळी सहा वाजता गोव्यात पोहचले. त्याचवेळी स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे दोन अस्थी कलश घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर विमानतळावर पोहचले होते. मुख्यमंत्री पर्रीकर हे विमानतळावर तेंडुलकर यांना भेटले व त्यांनी एक कलश स्वत:सोबत घेतला.
अमेरिकेला न्यूयॉकमध्ये स्लोन केटरींग कॅन्सर इस्पितळात मुख्यमंत्री गेले होते. ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही अमेरिकेलाच उपचारांसाठी गेले आहेत. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले तीन महिने मुंबईतील इस्पितळात उपचार घेत आहेत. गोव्याचे दोन मंत्री अनुक्रमे आरोग्य मंत्री विश्वजित राणो व कृषी मंत्री विजय सरदेसाई हे विदेशात खासगी भेटीवर गेले आहेत. सरदेसाई येत्या 26 रोजी परततील तर दि. 2 सप्टेंबरला आरोग्य मंत्री राणो गोव्यात दाखल होतील. गेले काही आठवडे मंत्रिमंडळाच्या बैठकाही होऊ शकलेल्या नाहीत. एकाबाजूने मंत्रिमंडळाची फेररचना व्हावी, असे काही भाजप आमदारांना वाटते व दुस-याबाजूने एकेक मंत्री आजारी पडू लागल्याने लोकही हवालदिल झाले आहेत.