पणजी - सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा संतापजनक अनुभव देशभरातील बॉर्डर खुल्या झाल्यानंतरही तब्बल ४८ तास सातार्डा आणि आरोंदा हद्दी खुल्या न केल्या गेल्याने वाहनधारकांनी घेतला. केंद्राच्या आदेशाने देशभर सर्वत्र मंगळवारी १ सप्टेंबर रोजी आंतरराज्य हद्दी खुल्या झाल्या असतानाही शेजारी सिंधुदुर्गाच्या सातार्डा आणि आरोंदा सीमा खुल्या करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला तब्बल दोन दिवस लागले. दोन दिवस या सीमेवर महाराष्ट्र पोलिसांनी अक्षरश: खेळ मांडला होता.
गोवा सरकारने मंगळवारी १ रोजी सकाळीच आपल्या दोन्ही बॉर्डर खुल्या केल्या. परंतु गाड्या महाराष्ट्राच्या चेक पोस्टवर अडवून परत पाठवल्या जात होत्या. माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट म्हणजे प्रेत घेऊन जाणाऱ्या शववाहिका किंवा डेड बॉडीबरोबर जाणाऱ्या नातेवाईकांनाही महाराष्ट्राच्या या चेक पोस्टवरील पोलिसांकडून दयामाया दाखवली जात नव्हती. विनवण्या करुनही मुजोरीची उत्तरे दिली जात होती.
केवळ राष्ट्रीय महामार्ग सुरू झालेले आहेत. दोन राज्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्गांवरील सीमा खुल्या करण्याचा आदेश आलेला नाही, असे कारण देऊन वाहनधारकांची अडवणूक केली जात होती. आरोग्याच्या आणीबाणीच्या प्रसंगी गोमेकॉत उपचार घेण्यासाठी शेजारी सिंधुदुर्ग, कारवारमधून अनेकजण येतात. कारवारमधील लोकांना हा प्रश्न आला नाही. कारण कर्नाटकने त्याच दिवशी सीमा खुल्या केल्या. परंतु महाराष्ट्रातील शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या लोकांना मात्र याची मोठी झळ पोहोचली. गोमेकॉत मयत झालेल्या व्यक्तीचे प्रेत सातार्डा हद्दीवर अडविण्यात येत होते. प्रेताबरोबर जाणाऱ्या नातलगांनाही परत पाठवले जात होते.
मंगळवारी सातार्डा भाजपाचे मंडळ अध्यक्ष महेश धुरी, स्थानिक भाजप युवा मोचार्चे उपाध्यक्ष जावेद खतीब, शेखर गांवकर व सुमारे दीडेकशे स्थानिकांनी सातार्डा पोलीसांना बॉर्डर बंद ठेवल्याबद्दल जाब विचारला. मंगळवार दुपारपर्यंत 'वरून आदेश येईल', असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते परंतु तो दिवस उजाडायला दोन दिवस लागले.
नोकरदारांचीही केली दोन दिवस अडवणूक
दरम्यान, सातार्डा आणि आरोंदा बॉर्डरवर नोकरदारांचीही गेले दोन दिवस अडवणूक करण्यात येत होती. सिंधुदुगार्तून गोव्यात औद्योगिक वसाहती तसेच अन्य आस्थापनांमध्ये दररोज कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे गोव्यातीलही काही नोकरदार सिंधुदुर्गात बँका तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये कामाला जातात. देशात सर्वत्र हद्दी खुल्या झाल्या असतानासुद्धा सातार्डा येथे पोलिसांची मुजोरी चालली होती.