पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या 30 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सोमवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात झालेल्या बैठकीवेळी निश्चित करण्यात आले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, उपसभापती मायकल लोबो, आमदार चर्चिल आलेमाव यांच्या सहभागाने विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक सोमवारी पार पडली. विधानसभा अधिवेशन फक्त तीनच दिवस असेल. पहिल्या दिवशी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांचे अभिभाषण होईल. विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढविला जावा अशी मागणी कवळेकर यांनी केली होती पण सरकारला ती मान्य झाली नाही. केवळ दोनच दिवस प्रश्न विचारण्यासाठी मिळतील, हे पुरेसे नाही असे कवळेकर म्हणाले होते. पण सरकारने आपण 18 दिवसांचे अधिवेशन नंतर घेईन, अशी भूमिका यापूर्वी घेतलेली आहे.
पर्रीकर अधिवेशन कामकाजाच्या दुस-या दिवशी म्हणजे 30 रोजी 2019-2020 सालासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. पुरवणी मागण्या, लेखानुदान मंजुर करून घेणे असे कामकाज तीन दिवसांत पार पडेल. शेवटच्या दिवशी म्हणजे 31 रोजी विनियोजन विधेयक मांडले जाईल. एकूण तीन सरकारी दुरुस्ती विधेयके अधिवेशनात सादर होणार आहेत. त्यात माल व सेवा कर (जीएसटी) विधेयक व अनुसूचित जाती-जमातीविषयक एका दुरुस्ती विधेयकाचा समावेश आहे.
दोन आमदार येणे कठीण?
दरम्यान, भाजपचे दोन आमदार रुग्णालयात उपचार घेत आहेत. विधानसभा अधिवेशनास हे दोन आमदार उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडे 38 सदस्यीय विधानसभेत एकूण चौदा आमदारांचे संख्याबळ आहे. दोन आमदार अनुपस्थित राहिले तरी, पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीची स्थिरता अडचणीत येऊ शकणार नाही, कारण आघाडीकडे दोन वजा केल्यास 21 संख्याबळ आहे. सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी सरकारचा पाठींबा मागे घेतलेला नाही पण त्यांनी तो भविष्यात घेतला तरी, 38 सदस्यीय विधानसभेत 20 आमदारांचे संख्याबळ भाजपला तारक ठरेल. कारण विरोधी काँग्रेसकडे चौदा आमदार आहेत व राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव यांनी पाठिंबा दिला तर संख्याबळ 15 होते. फ्रान्सिस डिसोझा हे पुन्हा एका खासगी इस्पितळात दाखल झाले आहेत.