पणजी : मुंबई, पुणे, दिल्ली व इतर ठिकाणचे सराईत गुन्हेगार, गॅंगस्टर्स यांना गोव्याचे कॅसिनो आश्रयस्थान बनले आहेत. खंडणी, दरोड्यातून मिळणारे पैसे कॅसिनोंमध्ये उधळण्यासाठी गुन्हेगारही कॅसिनोंमध्ये येत असतात. अशाच एका घटनेत गेल्या वर्षी ॲागस्टमध्ये गोव्यातील एका कॅसिनो जहाजात प्रवेश करताना मुंबईतील विक्रांत दत्तात्रय देशमुख उर्फ विकी या वॅांटेड गुन्हेगाराला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुध्द खून, खंडणी, चोय्रा, दरोडे व इतर प्रकारचे ३३ गंभीर गुन्हे नोंद होते. ‘मोक्का’खाली त्याच्याविरुध्द दोन गुन्हे नोंद होते. नेरुळ, मुंबई येथील हत्येप्रकरणीही तो मुंबई पोलिसांना हवा होता. त्याच्याकडे पाच जिवंत काडतुसे व बंदुक सापडली होती. मुंबई पोलिसांकडून तो गोव्याच्या कॅसिनोत येणार असल्याची विशिष्ट माहिती येथील पोलिसांना मिळाली व त्याला गोवा पोलिसांना सापळा रचून पकडले होते. अशा प्रकारचे गुन्हेगार कॅसिनोंमध्ये येत असतात.
‘कारावेला’ या तरंगत्या कॅसिनोला सर्वप्रथम परवानगी देण्यात आली. त्यानंतर मांडवी नदीपात्रात महाकाय कॅसिनो जहाजांची संख्या वाढतच गेली. काँग्रेस सरकारच्या काळात मांडवीत तीन कॅसिनो आले. परंतु त्यानंतर भाजप सरकारने आणखी तीन आणले आणि आता मांडवीतील कॅसिनोंची संख्या सहा बनली आहे. आज सहा तरंगते कॅसिनो मांडवी नदीपात्रात आहेत. तसेच जमिनींवर हॅाटेलांमध्येही अनेक कॅसिनो आहेत. ‘आग’ या संघटनेने सुरवातीला कॅसिनोंना प्रचंड विरोध केला. परंतु हा विरोध फार काळ टिकला नाही. भाजप विरोधात असताना कॅसिनोंविरोधात मशाल मिरवणुका वगैरे काढल्या होत्या तेव्हा दिवंगत मनोहर पर्रीकर हे विरोधी पक्षनेते होते. परंतु नंतर पर्रीकर सरकारच्या काळात आणखी कॅसिनोंना परवाने देण्यात आले.
मांडवी नदीपात्रात कॅसिनो नांगरुन ठेवण्यास पणजीवासीयांचा विरोध आहे. मध्यंतरी ही कॅसिनो जहाजे आग्वादला समुद्रात हलवण्याच्या हालचाली चालल्या होत्या मात्र कळंगुट, साळगांवमधील लोकांनी तीव्र विरोध केला. पर्यटनाच्या नावाखाली सरकार कॅसिनोंना प्रोत्साहन देत असल्याचा जनतेचा आरोप होता. कॅसिनोंमुळे ड्रग्स, वेश्याव्यवसायही फोफावेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.नियमानुसार कसिनो जहाजाची लांबी ९0 मिटरपेक्षा जास्त आणि रुंदी १७ मिटरपेक्षा अधिक असू नये. १८ जुलै १९९६ रोजी तसे स्पष्ट नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत. परंतु यापेक्षाही अधिक लांबीची कॅसिनो जहाजे मांडवी नदीपात्रात आहेत. गोमंतकीयांना कॅसिनोंवर जाण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु अनेक गोवेकरही कॅसिनोंमध्ये जात असतात आणि व्यसनाधीन होऊन त्यांची कुटूंबे उध्वस्त झालेली आहेत.