पणजी - गोव्याचे कोणतेच मंत्री व आमदार आता राज्यातील ड्रग्ज माफीयांविरूद्ध बोलेनासे झाले आहेत. ड्रग्ज माफीयांविरूद्ध बोलणे किंवा कृती करणे हे काही मंत्र्यांना स्वत:साठी धोकादायक वाटू लागले आहे. खुद्द मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता केलेल्या ताजा विधानानंतर काही मंत्री अधिक सावध झाले आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की आपण संरक्षण मंत्री असताना अतिरेक्यांना घाबरलो नाही. त्यांच्याशी जर आपण वैर पत्करू शकतो तर आपण गोव्यातील ड्रग्ज व्यवहाराविरूद्धही निश्चितच कारवाई करू शकतो.
मुख्यमंत्री म्हणाले की जर कुणाला ड्रग्ज माफीयांची भीती वाटत असेल तर त्यांनी जाहीरपणे न बोलता आपल्याला खासगीत ड्रग्ज व्यवहारांविषयी माहिती द्यावी. आपण पोलिसांमार्फत कारवाई करून घेईन. पत्रकारांनी देखील आपल्याला खासगीत माहिती द्यावी.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोव्याचे जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यानी आपल्या जीवाला धोका असल्याचे जाहीर विधान केले होते. काही मंत्र्यांमध्ये त्याविषयीच्या आठवणीही ताज्या आहेत. आपण किनारी भागातील ड्रग्ज व्यवहारांविरूद्ध भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्याला धोका संभवतो, असे मंत्री पालयेकर यांनी नमूद करून आपण आता किनार्यावर सकाळी जॉगिंग करण्यासाठीदेखील जात नाही, असे विधान केले होते. त्यानंतर पोलिसांनी मंत्री पालयेकर यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
भाजपाचे किनारी भागातील आमदार मायकल लोबो यांनीही आता ड्रग्ज माफीयांविरूद्ध बोलणे थांबवले आहे. आपण जाहीरपणे न बोलता मुख्यमंत्री पर्रीकर यांना खासगीत माहिती देईन असे लोबो यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान गोव्यात पर्यटन मोसमाच्या काळातच ड्रग्ज व्यवसाय वाढत असतो. त्यामुळे या दिवसांत किनारपट्टी भागात जास्त पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. गेल्या 2 महिन्यांत पोलिसांनी 52 गुन्हे नोंद करून 59 व्यक्तीना ड्रग्ज व्यवहार प्रकरणी अटक केली आहे.