गोव्याच्या अभियंत्यांना कर्नाटकची तंबी, म्हादईप्रश्नी कणकुंबीतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:14 PM2018-08-08T17:14:26+5:302018-08-08T17:18:03+5:30
म्हादई पाणी प्रश्न गंभीर स्थितीत पोहचलेला असताना गोवा व कर्नाटकच्या सीमेवरील कणकुंबी येथे बुधवारी मोठे नाट्य रंगले.
पणजी : म्हादई पाणी प्रश्न गंभीर स्थितीत पोहचलेला असताना गोवा व कर्नाटकच्या सीमेवरील कणकुंबी येथे बुधवारी मोठे नाट्य रंगले. गोव्याच्या जलसंसाधन खात्याच्या एका सहाय्यक अभियंत्यासह तिघांना कर्नाटकच्या पोलिसांनी कणकुंबी येथून ताब्यात घेतले. त्यांना अटकच झाली अशी गोवा सरकारचे मंत्री विनोद पालयेकर यांची भावना बनली. शेवटी तासाभरानंतर या अभियंत्यांना कर्नाटकने कडक शब्दात तंबी देऊन त्यांची सुटका केली.
कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळविले आहे. त्यामुळे गोवा सरकार आक्रमक बनू पाहत आहे. गोव्याच्या जलसंसाधन खात्याने म्हादई नदीच्या पात्रचे पाणी कसे व कुठे वळवले हे दाखवून देणारे फोटो आणण्यास आपल्या अभियंत्यांना सांगितले होते. त्यानुसार दोघे अभियंते व एक कर्मचारी मिळून तिघेजण बुधवारी कणकुंबी येथे गेले. तिथे या तिघांनाही कर्नाटकच्या पोलिसांनी व तिथे उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यामुळे जलसंसाधन खात्याने मंत्री पालयेकर यांच्याशी संपर्क साधला व गोव्याच्या तिघा अधिकाऱ्यांना कणकुंबी येथून अटक करण्यात आल्याची माहिती त्यांना दिली. मंत्री पालयेकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कृष्णमूर्ती यांच्याशी संपर्क साधला. मुख्य सचिव धमेंद्र शर्मा हे फोन घेत नव्हते व त्यामुळे पालयेकर यांनी कृष्णमुर्ती यांच्याशी बोलणी केली व कर्नाटकच्या मुख्य सचिवांशी जरा बोला व गोव्याच्या जलसंसाधन अभियंत्यांची सुटका करून घ्या, अशी सूचना त्यांना केली.
मंत्री पालयेकर यांनी याविषयी लोकमतला सांगितले की, तासाभरानंतर गोव्याच्या जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांची कर्नाटकने सुटका केली. तुम्ही दुसऱ्यावेळी येथे येताना गोवा पोलिसांच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अधिकारांविषयीचे पत्र घेऊन या, अशा शब्दांत गोव्याच्या अभियंत्यांना तंबी देण्यात आली. गोव्याच्या अधिकाऱ्यांना मुद्दाम घाबरवून टाकण्याचा प्रकार कर्नाटकने केला आहे.
न्यायालयात याचिका सादर
दरम्यान, म्हादईप्रश्नी तंटा हाताळणारे गोव्याच्या वकिलांच्या पथकाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका सादर केली. म्हादई नदीचे पाणी आपण वळवणार नाही, अशी हमी प्रतिज्ञापत्राद्वारे कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी दिली होती. तरीही आता पाणी वळविण्यात आल्याने कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका गोव्याने सादर केली, असे मंत्री पालयेकर यांनी सांगितले. म्हादई पाणी तंटा लवादाकडून पाणीप्रश्नी लवकरच निवाडा दिला जाण्याची शक्यता आहे.