पणजी : गोव्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शुक्रवारी सलग काही तास प्रचंड पाऊस पडल्याने बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतर करावे लागले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, रस्ते व छोटे पुल वाहून गेले तर काही ठिकाणी वीज ट्रान्सफॉर्मर मोडले आहेत. शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे गोव्याला मोठ्या हानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या वल्गना करणाऱ्या सरकारची अनास्था पाण्यावर तरंगताना दिसून आली.
उत्तर गोव्यातील वाळवंटी तसेच अस्नोडामधील पार या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जलसंसाधन खात्याने पंपिंग करून पाणी बाहेर सोडले. दुपारी पाऊस कमी झाल्यानंतर पूर ओसरला, अन्यथा हाहाकार उडाला असता. सभापती डॉ.प्रमोद सावंत यांनी साखळीला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. गोव्यातील हरवळेचा धबधबाही भरला असून डिचोलीतील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील तीन घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे त्या कुटुंबांना तात्पुरते अन्यत्र स्थलांतरीत करावे लागले आहे. मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीतील अनेक दुकानांत आणि काही घरांमध्येही पाणी गेले. तसेच पणजीतील सर्वच महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले होते. रस्त्यांच्या बाजूने पार्क करून ठेवलेली दुचाकी व अन्य वाहने अर्धी बुडाली होती. पणजी महापालिका इमारतीसमोरही गुडघाभर पाणी भरले होते. पणजी ते मिरामार व दोनापावल हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला होता. सरकार एकाबाजूने लोकांना पणजी शहरास स्मार्ट सिटी बनविण्याच्या वल्गना करतेय. मात्र, दुसरीकडे पाऊस पडताच अर्धे शहर पाण्याखाली जाते. त्यामुळे सरकारकडून केवळ बोलाची कडी अन् बोलाचाच भात, होत असल्याचे दिसून येते. फोंडा, म्हापसा, वास्को, मडगाव अशा शहरांमध्येही पावसामुळे काही रस्त्यांना नद्यांचे रुप प्राप्त झाले होते. पेडण्यात एक छोटा पूल खचला. पणजीपासून जवळच असलेल्या बांबोळी येथील रस्त्यावर व क्रॉससमोरून जाणाऱ्या रस्त्यालाही नदीचे रुप आले होते. काही भागांत लोकांनी रस्त्यावरील पाण्यात होड्या चालवून निषेधही केला. राज्यभर झाडे उन्मळून पडली. सत्तरी, सांगे, केपे, डिचोली अशा तालुक्यातील दुर्गम भागांतील लोकांना पावसाचा मारा असह्य झाला. वीज पुरवठाही अनेक ठिकाणी खंडीत झाला. झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळाले. कचरा, प्लॅस्टीक वगैरे पावसामुळे शहरांतील रस्त्यांवर वाहून आले.