पणजी : डिसेंबर महिन्यासोबत गोव्याचा फेस्टिव्ह मोसम सुरू झाला आहे. सेंट झेवियर्स फेस्त, नाताळ मग नववर्ष साजरे करणो अशा विविध कारणास्तव लाखो पर्यटक ह्या महिन्यात गोव्याला भेट देतील. नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक अतिमहनीय व्यक्ती गोव्यात येणार आहेत. उत्तर व दक्षिण गोव्यातील किना-यांवर सध्याही लाखो पर्यटकांची गर्दी आहे.
विशेषत: देशी पर्यटकांची गोव्यात झुंबड उडाली आहे. जुनेगोवे येथील सेंट झेवियर्स फेस्तानिमित्तानेही बरेच भाविक पर्यटक गोव्यात आलेले आहेत. किनारी भागात वाहनांची संख्याही खूप वाढलेली आहे. येत्या पंचवीस दिवसांत स्टेट गेस्ट म्हणून अनेक पाहुणे गोव्यात येणार आहेत. यात काही केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मंत्री, न्यायाधीश यांचा समावेश आहे.
उद्योगपती मुकेश अंबानींसह बॉलिवूडचे अनेक कलाकार दरवर्षी गोव्यात नववर्ष साजरे करण्यासाठी येतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेही येतात. यावेळीही अनेक दिग्गज दि. 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी गोव्यात असतील. 31 डिसेंबरला गोव्याच्या किनारपट्टीत नववर्ष स्वागतासाठी जंगी पाटर्य़ाचे आयोजन हॉटेल्सकडून केले जाणार आहे. त्याबाबतची तयारी सुरू आहे.
सुरेश प्रभू, जावडेकर गोव्यातगोवा विद्यापीठाचा पदवीदान सोहळा येत्या 15 रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे येत्या 15 रोजी गोव्यात दाखल होतील. तत्पूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू हे गोव्यात येऊन जातील. प्रभू हे उद्या 5 रोजी किंवा 6 रोजी गोव्यात येतील. 7 रोजी पणजीत अन्न प्रक्रियेमध्ये एमएसएमईएस इकोसिस्टमला बळकी या विषयावर परिषद होत आहे. त्या परिषदेला प्रभू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अनुसूचित जाती-जमाती व महिला उद्योजकांसाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांविषयी जागृती करणे हा परिषदेचा प्रमुख हेतू आहे. याच महिन्यात गोव्यात आयटीविषयक आणि अन्य परिषदाही होणार आहेत.