पणजी: कदंब महामंडळाच्या सर्व मार्गावरील सर्व प्रवासी बसगाड्या या कोणत्या रस्त्यावर कुठे पोहोचल्या आहेत याची माहिती देणारी ‘गुगल ट्रान्सीट’ नामक पद्धत कार्यान्वित करण्यात आली असून गोवा आयटी प्रोफेशनल्सच्या (जीआयटीपी)मदतीने प्रवाशांसाठी ही क्रांतिकारी सुविधा देण्यात आली आहे. कदंब महामंडळाच्या राज्यातील सर्व मार्गांवर धावणा-या प्रवासी बसगाड्यांची सविस्तर माहिती ही गुगल मॅपवर उपलब्ध करण्यात आली आहे. कोणती प्रवासी बस कोणत्या मार्गावर आहे व ती किती वाजता कुठे पोहोचणार याचाही वेध घेण्यात आला आहे. अर्थात ही माहिती रियल टाईम तत्वावर अद्याप करण्यात आलेली नसली तरी वेळापत्रकाच्या आधारावर नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्याला हवी असलेली प्रवासी बस पकडण्यासाठी फार मोठी मदत या सिस्टममद्वारे मिळणार आहे. महामंडळाची कदंब बससेवा असलेले लहान मोठे ३५० मार्ग आणि एकूण १९०० ट्रीप्स या सिस्टममध्ये सामाविष्ट करण्यात आल्या आहेत. अजूनही काही राहिलेले लहानसहान मार्गही त्यात समाविष्ट केले जाणार आहेत. विशेष म्हणजे ही माहिती मिळविण्यासाठी कुठलेही अॅप इन्स्टॉल करण्याचीही गरज नाही. गुगल मॅपवर आपले लॉकेशन निवडून ट्रेन /बस हा पर्याय निवडला की हे वेळापत्रक दिसेल. बसस्थानकांच्या नावावरून ही वेळापत्रके शोधता येतात. एखाद्या प्रवाशाला म्हापसाहून फोंड्याला जायचे असेल आणि त्या मार्गाला थेट बस उपलब्ध नसेल तर म्हापसा - पणजी - फोंडा असा मार्ग या सिस्टमवर दिसेल. मध्ये पणजीहून फोंड्याला जाणा-या बसगाड्यांचे वेळापत्रकही दिसेल. म्हणजे प्रवाशाला आपल्या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करणे शक्य होत आहे. तसेच कदंब बसगाड्याच्या सीटीबसच्या बाबतीतही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक खात्याकडून सहकार्य मिळाल्यास खाजगी बसगाड्यांचे वेळापत्रकाचाही त्यात सामाविष्ट करण्याची तयारी जीआयटीपीने ठेवली आहे.
... तर जीपीएस लोकेशनहीप्रवाशांसाठी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देता यावी यासाठी जीआयटीपीने तसा प्रस्ताव कदंब महामंडळाला दिला होता. महामंडळाकडून हिरवा कंदील मिळाल्यानं्तर २०१६ मध्ये तो हाती घेण्यात आला आणि लवकरच पूर्णही करण्यात आला अशी माहिती जीआयटीपीचे आयटी तज्ज्ञ यश गंथे यांनी दिली. या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून तो मूर्त स्वरूपात आणण्यापर्यंत गंथे यांचे मोठे योगदान आहे. महामंडळालाही हा प्रकल्प फारच आवडला. सर्व बसगाड्यांना जीपीएस उपकरण बसविल्यास भारतीय रेल्वेच्या धर्तीवर रियल टाईम तत्वावरही ही सेवा उपलब्ध करून देण्याची जीआयटीपीची तयारी आहे.