पणजी, दि.15- गोव्यात दोन वर्षांपूर्वी अत्यंत गाजलेल्या गोव्यातील किनार्यांच्या स्वच्छतेच्या कंत्राटातील घोटाळ्याच्या विषयावरून लोकायुक्तांनी आता शासकीय यंत्रणेला दणका दिला आहे. स्वच्छतेशी निगडीत कारस्थान व कथित दलाली याची चौकशी करण्याचा आदेश लोकायुक्तांनी गोवा पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला दिला आहे. लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी गेली दोन वर्षे याविषयी सुनावणी घेतली. कंत्राटात मोठा घोटाळा असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. याप्रकरणी चौकशीची फाईल नव्याने खुली करून पोलिसांनी तपास काम करावे. त्याचप्रमाणे सीबीआयकडेही हे प्रकरण तपासासाठी सोपवण्याबाबतचा निर्णय सरकार घेऊ शकते असे लोकायुक्तांनी आदेशपत्रातून सूचित केले आहे.
हा विषय यापूर्वी हायकोर्टापर्यंतही पोहचला आहे. गोवा विधानसभेत आमदार रोहन खंवटे यांनी दोन वर्षांपूर्वी हा विषय गाजवला होता. त्यानीच प्रथम लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. खंवटे आता सत्तेत आहेत.