- सदगुरू पाटील
पणजी : गेली चोवीस ते पंचवीस वर्षे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजीतील होळी उत्सवातील रंगपंचमीमध्ये सहभागी होत आले. मात्र यंदा प्रथमच पणजीतील पाटो कॉलनी, आझाद मैदान आणि अन्यत्र मनोहर पर्रीकरांच्या उपस्थिती शिवाय होळी साजरी झाली. मनोहर पर्रीकर नसल्याने त्यांचे समर्थक असलेले काही भाजप कार्यकर्तेही यंदा पणजीत रंगपंचमीवेळी दिसून आले नाहीत.
1994 साली मनोहप पर्रीकर हे प्रथम पणजीचे आमदार झाले. साधारणत: 1992 सालापासून मनोहर पर्रीकर यांचा राजधानी पणजीशी सातत्याने संपर्क येऊ लागला. त्यावेळी ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस होते. मात्र त्यांचा पणजीत खरा जनसंपर्क सुरू झाला तो 94 सालच्या विधानसभा निवडणुकीपासून. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे प्रथमच पणजीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले व घरोघर फिरू लागले. मनोहर पर्रीकर हे त्यावेळेपासून पणजीत दरवर्षी झालेल्या प्रत्येक होळी तथा रंगपंचमी उत्सवात सहभागी झाले.
पणजीतील आझाद मैदानावर हजारो नागरिक व पर्यटकांच्या सहभागाने रंगपंचमी साजरी होते. त्यातही मनोहर पर्रीकर काही वर्षे सहभागी झाले. आझाद मैदानावर येता आले नाही तरी, ते पाटो कॉलनी व पणजीतील अन्य भागांमध्ये जायचे व रंगपंचमी साजरी करायचे. मनोहर पर्रीकर रंगात पूर्ण न्हाऊन जायचे. रंगपंचमी साजरी झाल्यानंतर प्रारंभी ते मिरामार येथील समुद्रात आंघोळ करायचे.
शुक्रवारी आझाद मैदानावरील गुलालोत्सवात पणजीचे माजी आमदार असलेले सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हे सहभागी झाले. पणजीतील भाजपा समर्थक नगरसेवक मात्र सहभागी झाले नाही. एरव्ही भाजपाचे सगळे नगरसेवक आझाद मैदानावरील गुलालोत्सवात सहभागी व्हायचे. पणजीचे माजी महापौर शुभम चोडणकर हेही आझाद मैदानावर यावेळी आले नाही. मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असतानाही पणजीत रंगपंचमीसाठी आले होते. सरकारी पाटो कॉलनीमध्ये मनोहप पर्रीकर होळीला आले होते, त्यावेळी ते संरक्षण मंत्रीपदी होते, असे कॉलनीतील काही नागरिकांनी लोकमतला सांगितले. मनोहर पर्रीकरांना रंग लावण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची रंगपंचमीला पणजीत झुंबड उडायची. मनोहर पर्रीकर यंदा आजारी असल्याने पणजीतील होळीत सहभागी झाले नाही. ते घराबाहेरच पडले नाहीत. गुरुवारीच त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. इनफेक्शन होऊ नये म्हणून मनोहर पर्रीकर लोकसंपर्कापासून दूर राहिले आहेत.
मनोहर पर्रीकर दोनापावल येथील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. काही महत्त्वाच्या शासकीय फाईल्स त्यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवून देण्यात आल्या असून त्या फाईल्स ते हाताळत आहेत, असे सरकारी सुत्रांनी सांगितले. पर्रीकर यांना आम्ही यंदाच्या गुलालोत्सवात मिस करू, अशी प्रतिक्रिया पणजीतील उद्योगपती तथा शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी गुरुवारीच व्यक्त केली होती.