वासुदेव पागी -
पणजी - कर्नाटकच्या म्हादयी नदीचे पाणी अडविण्याच्या कळसा भंडुरा प्रकल्पाच्या विस्तारीत प्रकल्पाला केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी कर्नाटक विधानसभेत दिली आहे. या निर्णयामुळे गोव्याची जीवनदायीनी म्हादयीचे भवितव्य धोक्यात आले असून गोव्यातील पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या विस्ताव प्रकल्पासाठीचा मूळ प्रस्ताव मंजुरीसाठी रखडल्यामुळे कर्नाटकने सुधारीत प्रस्ताव केंद्राला पठविला होता. त्यात जलाशयाची उंची कमी करण्यासाठी कळसामध्ये १.७२ टीएमसी आणि भांडुरामध्ये २.१८ टीएमसी असे एकूण ३.९ टीएमसी पाणी वापरण्याचा प्रस्ताव होता. कर्नाटकच्या सुधारीत प्रस्तावालाही गोवयाने कडाडून विरोध केला होता, परंतु गोव्याच्या विरोधाला न जुमानता सुधारीत प्रस्ताव केंद्राने मजूर केला आहे. बेळगावच्या पालक मंत्र्यांनी याची माहिती कर्नाटक विधानसभेतही दिली आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारचे आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभारही मानले आहेत. गोवा सरकारने अजून या विषयावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे ट्वीटर हेंडलही या मुद्यावर शांत होते, जलस्रोत मंत्र्यांनीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान विरोधी पक्षांनी मात्र म्हादयी राखण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका केली आहे. सरकारने म्हादयीचा सौदा केल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
म्हादयीबरोबर सेल्फीची शेवटची संधीवाहतूक व्यवस्था खोळंबून टाकणाऱ्या नवीन जुवारी पुलावरील सेल्फीचा मुद्दा ताजा असतानाच गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी एक ट्वीटकरून केंद्राच्या म्हादयी संदर्भातील निर्णयावर प्रतिक्रिया देताना आता म्हादयीबरोबर सेल्फी घेण्याची अखेरची संधी राहिल्याचे म्हटले आहे. ही ट्वीट त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही टॅग केली आहे.