पणजी, दि. 21 - गोव्यातील खनिज उत्पादन मर्यादा येत्या मोसमात 20 दशलक्ष टनावरून 35 दशलक्ष टनापर्यंत वाढवावी, अशी खनिज व्यवसायिकांची मागणी असली तरी प्रत्यक्षात त्याविषयी अजून सर्वोच्च न्यायालयात निवाडा होऊ शकलेला नाही. येत्या महिन्यात गोव्याचा नवा खनिज मोसम सुरू होत आहे. अजूनही उत्पादन मर्यादा 20 दशलक्ष टन एवढीच आहे.
सर्वोच्च न्यायालयात या महिन्यात खनिज उत्पादन मर्यादेबाबत निवाडा होईल, असे गोव्यातील खनिज व्यवसायिकांना वाटले होते. पण निवाडा होऊ शकलेला नाही. केंद्र सरकारने याविषयी बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदत मागून घेतली आहे. आता 24 ऑक्टोबर रोजी याविषयी सुनावणी होणार आहे. एकंदरीत गोव्याचा नवा खनिज मोसम येत्या महिन्यात सुरू होईल.
तेव्हा उत्पादन मर्यादा 20 दशलक्ष टन एवढीच असेल. त्याहून जास्त प्रमाणात गोव्यातील व्यवसायिक खनिज उत्पादन घेऊ शकणार नाहीत. गोव्यातील वाढते धुळ प्रदूषण, अरुंद रस्ते व त्यावरून हजारो खनिजवाहू ट्रक धावल्याने निर्माण होणाऱ्या समस्या तसेच अनिर्बंध खनिज उत्खननामुळे होणारी नैसर्गिक हानी या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेच गेल्या वर्षी 20 दशलक्ष टन उत्पादन मर्यादा गोव्याला ठरवून दिली आहे. ती वाढवण्यास गोव्यातील पर्यावरणप्रेमी संघटनांचा विरोध आहे.