पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून कबड्डी क्रीडा प्रकाराला सुरुवात झाली आहे. गोव्याने मिश्र कामगिरी केली आहे. गोव्याच्या महिला संघाने पहिल्या सामन्यात विजयाची चव चाखली, तर पुरुषांंना पहिल्या सामन्यात पराभवला सामोरे जावे लागले. कांपाल येथील इनडोअर संकुलात या स्पर्धा सुरू आहेत.
महिला संघाचा पहिला सामना झारखंडविरुद्ध होता. गोव्याच्या महिला संघाने स्पर्धेची सुरुवात दमदार विजयाने केली. गोव्याने ४३-२३ अशा फरकाने झारखंडवर मात केली. गोव्यातर्फे यश्मीता तळवडकर, अंकिता म्हार्दोळकर यांनी चांगली रेड करत गुण मिळवित वेळोवेळी आघाडी घेतली, तर अलिशा अकारकर व मनिषा हिने उत्कृष्ट बचाव केला. त्यांच्या या खेळाच्या जोरावर संघाने हा विजय प्राप्त केला. त्यांना प्रशिक्षक ओंकार गावस यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. गोव्याचा दुसरा सामना ५ रोजी हरयानाशी होणार आहे.
गोव्याच्या पुरुष संघाला मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तरप्रदेश विरुद्ध झालेल्या या सामन्यात, उत्तरप्रदेशने ६०-३१ अशा मोठ्या फरकाने गोव्याचा पराभव केला. गोव्यातर्फे कर्णधार नेहाल सावळ देसाई याने चांगली खेळी केली, परंतु संघाला विजय मिळवून देण्यास तो असफल ठरला. गोव्याच्या पुरुष संघाचा दुसरा सामना ५ रोजी बलाढ्य सेनादल विरुद्ध होणार आहे.
कबड्डीप्रेमींना प्रवेश नाकारला, अनेकांची हिरमोड
कांपाल येथील इनडोअर हॉलमध्ये कबड्डी सामने खेळविण्यात येत आहे. गोव्याचे सामने होत असल्याचे कळताच राज्यातील, राज्याबाहेरील कबड्डीप्रेमींनी गर्दी केली. खेळाडूंचे कुटुंबीय व मित्रमंडळींनी देखील हजेरी लावली, परंतु लोकांना बसण्यासाठी जागाच नसल्याने कबड्डीप्रेमींना येथे प्रवेश नाकारण्यात आला. अनेकांची हिरमोड झाला. अनेकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यासदेखील सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सामने खेळविण्यात आले. इनडोअर हॉलमध्ये फक्त २०० जणांची क्षमता आहे, त्यामुळे हा वाद समोर आला. अनेकांनी हे सामने इतर ठिकाणी खेळविण्यात यावेत, अशी मागणी यावेळी केली.