पणजी : गोव्याचे नवे मंत्री मिलिंद नाईक यांनी काल बुधवारी काम सुरु केले. दुपारी समाजकल्याण, पालिका प्रशासन आणि प्रोव्हेदोरिया खात्याच्या अधिका-यांच्या बैठका घेऊन त्यांनी खात्यांविषयी माहिती घेतली.
पर्वरी येथे मंत्रालयात याआधीच्या कारकिर्दित वीजमंत्री असताना तसेच एनआरआय आयुक्तपदी असताना घेतलेले ३0१ क्रमांकाचे केबिनच त्यांनी यावेळीही घेतले आहे. काल दुपारी ३.३0 वाजता ते मंत्रालयात दाखल झाले.
या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, ‘माझ्यासाठी तिन्ही खाती नवीन असल्याने आधी ही खाती मी समजून घेईन. त्यासाठीच तिन्ही खात्याच्या अधिका-यांना बोलावले होते. सुरवातीला माझे काम लोकांना संथ वाटेल परंतु खाती पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय कोणतीच पावले मी उचलणार नाही.’
समाज कल्याण खात्याचा कारभार व्यापक आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना तसेच अन्य योजना, वेगवेगळ्या समाजांच्या राखीवतेचा आदी अनेक विषय आहेत.
दरम्यान, वीजमंत्री निलेश काब्राल यांनी अजून काम सुरु केलेले नाही. आपल्या कुडचडे मतदारसंघातच त्यांचा वावर आहे. या प्रतिनिधीने विचारले असता पुढील एक-दिवसात ताबा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.