सुशांत कुंकळयेकर
मडगाव: गोव्यात बेकायदा वास्तव करुन रहाणाऱ्यांमध्ये नायजेरियनांची संख्या जास्त आहे अशी जी सर्वसाधारण कल्पना आहे त्याला छेद देणारी माहिती सध्या पुढे आली आहे. गोव्यात बेकायदा वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक केल्यानंतर अशाप्रकारे बेकायदा वास्तव करुन रहाणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या रशियन नागरिकांची असून त्या पाठोपाठ ब्रिटीशांचा नंबर लागतो हे सत्य पुढे आले आहे.
गोव्यात नायजेरियनांचे सर्वात अधिक बेकायदेशीर वास्तव असल्याचे जरी सांगितले जात आहे तरी आतार्पयत ज्या 28 विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले त्यात एकहीनायजेरियन नागरीकाचा समावेश नाही. याबद्दल विदेशी नागरीक नोंदणी विभागाचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना विचारले असता ते म्हणाले, सगळेच कृष्णवर्णीय विदेशी नागरीक नायजेरियन असा गोव्यात समज आहे. कित्येकदा बेकायदा वास्तव करुन रहाणारे विदेशी आपला मूळ देश कोणता हे लपवून ठेवतात. मात्र त्यांना अटक केल्यानंतर त्यांचा देश कोणता हे स्पष्ट होते. सध्या म्हापशातील नजरबंदी केंद्रात फक्त दोघेच नायजेरियन आहेत. आतार्पयत अटक केलेल्या कृष्णवर्णीय नागरिकांमध्ये तांझानिया, युगांडा, आंगोला, काँगो व ब्राङिालचे नागरीक सापडले आहेत.
विदेशी पर्यटकांसाठी गोवा जरी एकप्रकारे स्वर्गीयस्थान असले तरी कित्येक विदेशी पर्यटक गोव्यातच बेकायदेशीरपणो ठाण मांडून रहात असल्यामुळे स्थानिक प्रशासनालाही ही एक डोकेदुखी बनली आहे. गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करण्याच्या आरोपाखाली पकडलेल्या 28 विदेशी नागरिकांची रवानगी त्यांच्या मायदेशात करण्यात आली असून अजुनही 9 विदेशी नागरीक म्हापशातील नजरबंदी केंद्रात स्थानबद्ध आहेत. आतार्पयत मायदेशी पाठविलेल्यामध्ये 5 रशियन, 4 ब्रिटीश व टांझानियन, येमेन, कझाकस्तान, युक्रेन, युगांडा या देशातील प्रत्येकी दोन तर आंगोला, आर्यलड, काँगो, फिनलँड, स्वीडन, इज्रायल व ब्राझीलच्या प्रत्येकी एक नागरिकाचा समावेश आहे. यंदा यापैकी 20 जणांना बेकायदा वास्तवासाठी अटक करण्यात आली होती. त्यापैकी 11 जणांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले.
विदेशी नोंदणी विभाग हाताळणारे पोलीस अधिक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, मागच्या 9 महिन्यात वेगवेगळय़ा 14 देशातील बेकायदेशीर वास्तव करुन असलेल्या तब्बल 28 विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले असून या सर्वाना सध्या काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. काळ्या यादीत असलेल्या विदेशी नागरिकांना किमान एक वर्ष तरी भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही जणांवर ही बंदी अधिक काळासाठीही आहे.
जॉर्ज म्हणाले, अजुनही 9 विदेशी नागरीक म्हापशातील नजरबंदी केंद्रात स्थानबद्ध आहेत. त्यांना त्यांच्या देशात पाठविण्यासाठी त्यांच्या देशातील दुतावासाशी संपर्क साधला आहे. दुतावासाकडून प्रवासासाठी वैध कागदपत्रे आल्यानंतर त्यांचीही रवानगी त्यांच्या मायदेशात करण्यात येणार आहे.गोव्यात बेकायदा वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशीपैकी बहुतेकजण बिझनेस व्हिसावर गोव्यात आले होते. मात्र त्यांचा व्हिसा संपल्यानंतरही त्यांचे वास्तव गोव्यातच होते. यातील काहीजण अंमली पदार्थाच्या व्यवहारात असल्याचेही दिसून आले होते. काहीजणांना अंमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांचे बेकायदेशीर वास्तव उघड झाले होते.
गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, बेकायदा वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशी नागरिकांना आता म्हापशातील नजरबंदी केंद्रात स्थानबद्ध केले जात असल्याने असे वास्तव करुन राहिल्यास त्या नागरिकांवर कारवाई होणार हा संदेश बऱ्यापैकी विदेशी नागरिकांमध्ये पोहोचला आहे. या कारवाईचा नेमका गोव्याला फायदा काय झाला हे कळण्यासाठी आणखी पाच सहा महिने जावे लागतील. मात्र अशा कारवाईमुळे बेकायदा वास्तव ब:याच प्रमाणात नियंत्रणाखाली येईल एवढे नक्की असे सांगितले.