- पंकज शेट्ये
वास्को: शनिवारी (दि. १६) दुपारी भारतीय नौदलाचे ‘मिग २९के’ विमान गोव्यात कोसळण्याची घटना घडली असून सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही. नौदलाचे लढाऊ अथवा इतर विमान कोसळण्याची घटना गोवेकरांसाठी नवीन नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
२००२ मध्ये नौदलाच्या एका समारंभानिमित्ताने उड्डाण घेतलेल्या नौदलाची ‘इल्युजन ३८ ’ नावाची दोन विमाने एकमेकांना धडकून झालेल्या घटनेत १५ जणांना जीव गमवावा लागला होता. यात १२ नौदलाचे अधिकारी होते तर ३ अन्य नागरिक होते. या घटनेची आठवण सुद्धा झाल्यास भीतीने अंगावर काटा येण्याचा प्रसंग निर्माण होतो. या दोन विमानांपैकी एक विमान ‘एमईएम कॉलेज’जवळ एका बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी कोसळले होते तर दुसरे विमान जवळच्याच अन्य एका भागात कोसळले.
ऑक्टोबर २०१२ मध्ये नौदलाचे चेतक हॅलिकॉप्टर दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळल्याने ह्या घटनेत तिघा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सदर घटनेत मरण पोचलेल्या तिघांपैकी दोघेजण नौदलाचे तरुण वैमानिक होते तर एक नौदलाचा तांत्रिक विभागातील कर्मचारी होता. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली होती अशी त्यावेळी चर्चा होती.
मे २००१ मध्ये नौदलाचे ‘सी हॅरीयर’ विमान काणकोण भागात कोसळण्याची घटना घडली होती. सदर घटनेत सुदैवाने विमानाचा वैमानिक बचावला होता. एप्रिल २००७ सालात दाबोळी धावपट्टीवरून ‘सी हॅरीयर’ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच हे विमान समुद्रात जाऊन कोसळले. ही घटना घडण्याच्या वेळी यात असलेल्या दोन्ही वैमानिकांचा वेळ चांगला असल्याने ते या दुर्घटनेतून सुखरूप बचावले होते.
जानेवारी २०१८ सालात दाबोळीच्या धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या प्रयत्नात असलेले ‘मीग २९के’ विमान उड्डाणपट्टी पासून २०० मीटर अंतरावर पुढे जाऊन कोसळले. दुर्घटना घडत असल्याचे वैमानिकाला समजताच तो वेळेवरच बाहेर आल्याने सदर दुर्घटनेतून त्याला त्याचे प्राण वाचवण्यास यश प्राप्त झाले.
गोव्यात भारतीय नौदलाची विमाने कोसळण्याची मागील वर्षात १० हून अधिक घटना घडलेल्या असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. १९८८ मध्ये गोव्यात नौदलाचे पहिले विमान कोसळण्याची घटना घडल्याचे मानले जाते. ह्या वर्षाच्या मे महिन्यात गोव्यानजीक नौदलाचे ‘सी हॅरीयर’ विमान कोसळून सदर घटनेत विमानातील वैमानिकाचा मृत्यू झाला होता.