पणजी, दि. 22 - गोव्यातील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हे शुक्रवारी गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचसमोर हजर झाले. कवळेकर यांच्या निवासस्थानी व कार्यालयात पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मारलेल्या छापेमारीदरम्यान मटका-जुगाराच्या स्लिप्स सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांची चौकशी चालवली आहे.
कवळेकर यांना पोलिसांच्या क्राईम ब्रांचने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार ते हजर झाले. छापेमारीत सापडलेल्या त्या मटका स्लिपशी आपला काही संबंध नाही, असे कवळेकर यांचे म्हणणे आहे. पण स्लिप्सचे प्रमाण पाहता कवळेकर यांच्या निवासस्थानातून कुणी तरी मटका जुगाराचा व्यवसाय चालवत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान कवळेकर यांच्याविरुद्ध गेल्याच आठवड्यात पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत गुन्हा नोंदवला आहे. विरोधी पक्षनेत्याच्या घरी मटका स्लिप्स सापडल्याने विरोधी भाजपने कवळेकर यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवले जावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कवळेकर हे सलग चारवेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत.