पणजी - ज्या गोमंतकीयांनी स्वत:च्या जन्माची नोंदणी पोर्तुगालमध्ये केली व पोर्तुगीज ओळखपत्र प्राप्त केले आहे, अशा गोमंतकीयांच्या नावांची पोर्तुगीजांच्या मतदार यादीत नोंद होणार आहेत. गोव्यातील पोर्तुगीज नागरिकांना तशी पत्रे पोर्तुगालमधून येण्यास आता आरंभ झाला आहे. तुम्ही पोर्तुगालच्या मतदार यादीत तुमचे नाव नोंदवा अशी विनंती करणारी पत्रे मूळ गोमंतकीय असलेल्या गोव्यातील पोर्तुगीज नागरिकांच्या हाती पडू लागली आहेत.
18 डिसेंबर 1961 पर्यंत गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चौदा वर्षानी गोवा राज्य पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाले. मात्र अजुनही हजारो गोमंतकीय आपल्या जन्माची नोंद पोर्तुगालमध्ये करतात. त्यापैकी सगळेच पोर्तुगीज पासपोर्ट प्राप्त करत नाहीत पण काही शेकडो व्यक्ती पोर्तुगीज पासपोर्टही मिळवतात. युरोपियन राष्ट्रांमध्ये कामाधंद्यानिमित्त सहज फिरण्याची व स्थायिक होण्याचीही दारे उघडी होतात व त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्ट प्राप्त करण्याकडे सासष्टी, बार्देश, तिसवाडी व मुरगाव या चार तालुक्यांतील अनेक गोमंतकीयांचा ओढा आहे.
पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद करून पोर्तुगीज ओळखपत्र घेऊन ठेवलेले हजारो गोमंतकीय आहेत. पोतरुगीज ओळखपत्रला पोर्तुगालमध्ये बिलहेट दी आयडेंटीदादी असे म्हटले जाते. ज्या गोमंतकीयांनी पोर्तुगीज ओळखपत्र घेतले, त्यांनी ओळखपत्रासोबत दिलेली सगळी माहिती पोर्तुगीजमधील जनगणनेवेळी नोंद होते व पोर्तुगालचे मतदार होण्याचा अशा मूळ गोमंतकीयांना हक्क प्राप्त होतो. यामुळे पोर्तुगालहून आता गोव्यातील पोर्तुगीज नागरिकांना पत्रे येऊ लागली आहेत. ही पत्रे पोर्तुगीज भाषेत आहेत. गोव्यात पोर्तुगीज भाषेत वाचन करणारे काही लोक आहेत. त्यांनी ही पत्रे वाचून त्यातील अर्थ सांगण्याबाबत इतरांना मदत केली.
गोव्यातील चार तालुक्यांमधील हजारो नागरिकांनी गेल्या दहा वर्षात भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगीज नागरिकत्व प्राप्त केले आहे. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने त्यांची नावे गोव्याच्या मतदार यादीतून रद्द केली आहेत. काही नावे मात्र अजून गोव्याच्या यादीत शिल्लक असावीत असे मानले जात आहे. गोव्यात अजुनही पोर्तुगीज बार अशा नावाने एक-दोन खूप जुनी मद्यालयेही आहेत.