ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 02 - गोव्यातील बालरथांवरील म्हणजेच शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याची प्रक्रिया कदंब वाहतूक महामंडळाने सुरू केली आहे. मात्र, कदंब बसगाड्यांवर असलेली जाहिरात काढण्याच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्यापूर्वी आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती महामंडळाने गोवा राज्य महिला आयोगाला केली आहे.कदंबच्या बसगाड्यांवर आणि बालरथांवरही कंडोमच्या जाहिराती आहेत. त्यात एका महिलेचेही आक्षेपार्ह छायाचित्र आहे. ही जाहिरात काढून टाकली जावी, अशी मागणी रणरागिणी या महिला संस्थेने काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे निवेदनाद्वारे केली होती. आयोगाने कदंब महामंडळास तत्काळ पत्र पाठविले व जाहिराती हटविण्याची सूचना केली. महामंडळास आयोगाचे पत्र काल गुरुवारी मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बालरथांवर कंडोमची जाहिरात असू नये, या सूचनेचे तत्काळ पालन करण्यासाठी महामंडळाने पावले उचलली. संबंधित जाहिरात कंपनीला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ती जाहिरात काढण्यास सांगितले व त्यासाठी कंपनीही तयार झाली. जाहिरात तत्काळ हटवू, असे कंपनीने महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घाटे यांनी गुरुवारी लोकमतला सांगितल की कदंब बसगाड्यांवरील जाहिरात ही टीव्हीवरही झळकते व राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांमध्येही ती असते. शिवाय कदंब गाड्यांवर ती जाहिरात लावणे हे बेकायदा नव्हे. कदंबच्या बसगाड्या सार्वजनिक ठिकाणी असतात व त्यामुळे अशा प्रकारची जाहिरात ही महिला प्रवाशांसाठी अपमानास्पद ठरते, त्यामुळे त्या काढून टाकल्याच पाहिजेत, असे रणरागिणी संस्थेचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)
गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या बसवरील कंडोमची जाहिरात हटविणार
By admin | Published: March 02, 2017 9:42 PM