मडगाव- मागची कित्येक वर्षे वनहक्क कायद्यापासून वंचित असलेल्या गोव्यातील आदिवासी समाजाला आता दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनअधिकार कायद्याखालील सर्व हक्क आदिवासींना डिसेंबर २0१७ पर्यंत देण्याचे उद्दिष्ट्यं गोवा सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे अशी घोषणा गोव्याचे आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी केली आहे.
गोव्यातील आदिवासींना त्यांचे घटनात्मक हक्क मिळावेत यासाठी पाच वर्षापूर्वी गोव्यात उग्र आंदोलन झाले होते. या आंदोलनात दोन तरुण हुतात्मेही झाले होते. मंत्री गावडे हे स्वत: त्या आंदोलनातील कार्यकर्ते होते. आणि या आंदोलनात त्यांना एक महिन्याचा तुरुंगवासही सोसावा लागला होता. दक्षिण गोव्यात आदिवासी कल्याण संचलनालयाचे जिल्हास्तरीय कार्यालय शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर मडगावात सुरु झाले. यावेळी बोलताना गावडे यांनी गोव्यातील आदिवासी कलेला उत्तेजन देण्यासाठी राज्यात आदिवासी संस्कृती अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली. गावडे हे गोव्याच्या कला व संस्कृती खात्याचेही मंत्री आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई हेही उपस्थित होते. आदिवासी कल्याण योजनांतील बॅकलॉग येत्या दोन वर्षात भरुन काढला जाईल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मडगावचे जोड शहर असलेल्या फातोर्डा येथील पोलीस स्थानकाचेही उद्घाटन झाले. गोवा हे पर्यटक राज्य असल्याने स्थानिकांच्या तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोव्यात आणखीही अशी पोलीस स्थानके उघडली जातील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.