पणजी : गोव्यात एकूण 32 हजार टॅक्सी असून त्यांच्याकडून वार्षिक 6 हजार 700 कोटी रुपयांचा व्यवसाय केला जातो. मात्र गोवा सरकारला जीएसटी भरला जात नाही. कारण त्यांचा सगळाच व्यवहार रोखीने असतो व त्या व्यवहाराची नोंदही कुठेच राहत नाही, असा दावा गोवा माईल्स टॅक्सी ऍप सेवेचे चालक व अन्य लाभार्थीनी मिळून शुक्रवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.गोवा माईल्सकडे फक्त दीड हजार टॅक्सी व दीड हजार चालक आहेत. या टॅक्सी गोमंतकीयांच्या आहेत आणि हे चालकही गोमंतकीय आहेत, असे गोवा माईल्सचे प्रवक्ते जस्टन नुनीस तसेच हेमंत प्रभू चोडणेकर व अन्य व्यावसायिक म्हणाले. गोवा माईल्सच्या टॅक्सी वगळता राज्यात एकूण 32 हजार नोंदणीकृत टॅक्सी आहेत. रोज प्रत्येक टॅक्सीकडून सरासरी 70 रुपये प्राप्त केले जातात. हा सगळा व्यवहार रोखीने चालतो. यावर हे टॅक्सी व्यवसायिक पाच टक्के जीएसटी सरकारला जमा करत नाहीत. गोवा माईल्सच्या टॅक्सींकडून मात्र पाच टक्के जीएसटी शासकीय तिजोरीत जातो. जर 32 हजार टॅक्सींकडून जीएसटी आला असता तर वार्षिक तीनशे कोटींचा महसुल सरकारी तिजोरीत जमा झाला असता, असा दावा गोवा माईल्सच्या चालकांनी केला.गेल्या वर्षी सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने गोवा माईल्सची सेवा सुरू केली. या सेवेला ज्या टॅक्सी संघटना विरोध करतात, त्यांच्याकडून गोवा माईल्सविषयी अत्यंत चुकीचे चित्र उभे केले जात आहे. आम्ही परप्रांतांमधील आहोत असे दाखविले जात आहे. आम्ही गोमंतकीयच आहोत. गोव्याच्या सर्वच भागांतील टॅक्सींना गोवा माईल्स अॅपच्या सेवेखाली आणण्याचा प्रयत्न आहे. सरकारचा आम्हाला पाठींबा आहे. गोवा माईल्सच्या चालकांवर हल्ले केले जातात, त्यांना धमक्या दिल्या जातात. आम्ही विविध पोलीस स्थानकांमध्ये 16 एफआयआर आणि 8 अदखलपात्र गुन्हे नोंद केले आहेत, असे माईल्सच्या चालकांनी सांगितले.
गोव्यात 6700 कोटींचा बेहिशेबी टॅक्सी व्यवसाय, जीएसटीचा पत्ता नाही, गोवा माईल्सचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:49 AM