दोनापावला : गोव्याचा समान नागरी कायदा संपूर्ण देशासाठी उत्कृष्ट उदाहरण आहे. येथील कॉस्मोपॉलिटन संस्कृती आदर्शवत आहे. येथील बंधूभाव, सलोखा याचबरोबर आतिथ्यशिलता, उदारता वाखाणण्याजोगी आहे, असे कौतुकाचे उद्गार राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांनी काढले.
राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित नागरी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. राज्य सरकारतर्फे आयोजित या समारंभात व्यासपीठावर राज्यपाल पी. एस.श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व विरोधी पक्षनेते युरी आलेमांव उपस्थित होते.
मूर्मुजी म्हणाल्या की, ‘ समान नागरी कायद्याने गोव्यात महिला व पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. येथे उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे हे उल्लेखनीय बाब आहे. मनुष्यबळाच्या बाबतीत मात्र येथे महिलांची भागीदारी वाढली पाहिजे.’स्वयंपोषक विकासाच्या बाबतीत सर्व मापदंड ओलांडून गोव्याने नेत्रदिपक प्रगती केली आहे, असे गौरवोद्गार काढताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई व मुख्यमंत्र्यांच्या मागदर्शनामुळेच हे साध्य झाल्याचे नमूद करुन अभिनंदन केले.
‘आत्मनिर्भर भारत’च्या धर्तीवर ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रम सुरु करुन गोवा सरकारने तो यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल कौतुक होत असल्याने राष्ट्रपतींनी सरकारची वाहवा केली. राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘ गोव्यातील प्रतिभाशाली व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर केंद्रात त्यांच्या कार्यकुशलतेमुळे संरक्षणमंत्रीपदापर्यंत पोचले.’ राष्ट्रपतींच्या हस्ते या प्रसंगी वन निवासींना जमिनींचे हक्क प्रदान करणाय्रा सनदांचे वांटप करण्यात आले. तत्पूर्वी, दुपारी मुर्मुजी यांनी पणजीतील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.