किशोर कुबल/पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पल्लवी धेपें यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल २५५ कोटी ४४ लाख रुपयांची मालमत्ता दाखवली असून गोव्यात आतापर्यंतच्या त्या सर्वात धनाढ्य उमेदवार ठरल्या आहेत.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार तथा श्रीपाद नाईक यांनी सुमारे १२ कोटींची मालमत्ता दाखवली आहे. दोघांनीही काल आपापले उमेदवारी अर्ज सादर करताना ही मालमत्ता जाहीर केली आहे.गोव्यात एकेकाळी खाणसम्राट म्हणून ओळखले जाणारे धेंपो उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपे यांची पत्नी पल्लवी किती कोटींच्या मालकीण आहे याबाबत लोकांमध्ये उत्कंठा होती.
पल्लवी यांनी आपल्या हातातील रोख ४,०१५६ रुपये तर पती श्रीनिवास यांच्या हातातील रोख ६,५६,१४२ रुपये दाखवली आहे. ३,७५३.३४ ग्रॅम वजनाचे आजच्या बाजारभावाने ५ कोटी ६९ लाख ७८ हजार ८७३ रुपयांचे सुवर्णालंकार त्यांनी दाखवले आहेत. बॅंकांमधील स्वत:च्या नावावरील ठेवी : ९ कोटी ९१ लाख ३१ हजार ६४६ रुपये, पती श्रीनिवास यांच्या बॅंक ठेवी : २४ कोटी ५ लख ५३ हजार ६५९ रुपये, स्वत:च्या नावे पोस्टातील बचत, विमा पॉलिसी : १२ कोटी ९२ लाख १४ हजार १२१ रुपये, पती श्रीनिवास यांच्या नावे पोस्टातील बचत, विमा पॉलिसी ६७ कोटी ४५ लाख ८५ हजार ९४० रुपयांच्या दाखवल्या आहेत.
दरम्यान, उत्तर गोव्याचे भाजप उमेदवार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्थावर व जंगम मिळून सुमारे १२ कोटींची मालमत्ता अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवली आहे. २०२२-२३ चे उत्पन्न त्यांना १७ लाख ६३ हजार रुपये दाखवले आहे. हातातील रोख रक्कम १ लाख १९ हजार २८१ रुपये दाखवली आहे.
बॅक ठेवी (एफडी व टर्म डिपॉझिट) : १७ लाख २३ हजार ४३१ रुपये, रोखे/शेअर्स/ म्युच्युअल फंड : २२ लाख ६९ हजार ६२३ रुपये,मोटारी व वाहने १५ लाख ३४ हजार ८९५ रुपये व १० कोटींचा जमीन जुमला अशी त्यांची मालमत्ता आहे