वास्को - इराणने समुद्रात जप्त केलेल्या ‘स्टेना इम्पेरो’ या ब्रिटीश जहाजावर (ऑइल टँकर) गोव्याच्या वास्को शहरातील एक तरुण चौथा अभियंता म्हणून कामाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या जहाजावर काम करणाऱ्या अभियंत्याचे नाव गोविंद सुरेश नाईक असे असून तो चिखली, वास्को भागातील रहिवाशी आहे.मागच्या शुक्रवारी एका ब्रिटीश जहाज इराणाच्या समुद्रातून जात असताना ह्या जहाजाला ‘इराणी ट्रुप्स’ ने जप्त केले होते. सदर जहाजावर एकूण २३ अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या जहाजावर गोव्याचा गोविंद सुरेश नाईक हा कामाला असल्याची माहिती वास्को शहरात पसरताच त्याच्याबाबत नागरीकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान गोविंद यांचे वडील सुरेश नाईक यांना संपर्क केला असता आपला मुलगा जहाजावर सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. हे जहाज जप्त केल्यानंतर आम्हाला आमच्या मुलाची चिंता लागली होती. परंतू नंतर तो सुरक्षित असल्याचे समजल्यानंतर आमची भीती दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या तीन दिवसापासून गोविंद आमच्याशी मोबाईलवर बोलत असून त्यांने आपण पूर्णपणे येथे सुरक्षीत असल्याची माहीती दिली. सदर ब्रिटीश जहाज जरी ‘इराणी ट्रुप्स’ ने जप्त केले तरी ह्या जहाजावर असलेल्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास करण्यात येत नसून जेवण इत्यादी सर्व सुविधा वेळेवर मिळत असल्याचे गोविंद ने आम्हाला सांगितले असल्याचे त्यांच्या वडीलाने कळविले. तसेच ज्या जहाजात आमचा मुलगा काम करतो त्या कंपनीने आम्हाला संपर्क करून तो पूर्णपणे सुरक्षीत असल्याची माहीती दिल्याचे गोविंद यांचे वडील सुरेश यांनी सांगितले. लवकरच भारतीय दूतावास इराणच्या दूतावासाशी संपर्क करून याच्यावर असलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी चर्चा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गोविंद चौथ्यांदा जहाजावर कामासाठी गेला असून १६ जुलै रोजी तो दुबईहून त्या जहाजावर कामासाठी चढला होता अशी माहिती त्यांचे वडील सुरेश यांनी दिली. आमच्या मुलाला तसेच जहाजावरील इतर अधिकाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास नसून उलट त्यांना चांगल्या पद्धतीने वागवत असल्याची माहीती मिळाल्याने आम्हाला याबाबत समाधान असल्याचे वडील सुरेश म्हणाले. गोविंद यांचे वडील सुरेश नाईक यांचा बायणा, वास्को येथे हॉटेल व्यवसाय असून गोविंदच्या वडीलासहीत त्याची आई, दोन भाऊ व अन्य नातेवाईक तो कधी गोव्यात परततो ह्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी गोव्याच्या अनिवासी भारतीय आयुक्त (एनआरआय) चे चेअरमन नरेंद्र सावईकर यांना संपर्क केला असता त्या जहाजावर असलेला गोमंतकीय पूत्र गोविंद सुरेश नाईक सुरक्षीत रित्या गोव्यात परतवावा यासाठी प्रयत्न चालू केले असल्याची माहिती त्यांनी दिली. अनिवारी भारतीय आयुक्त संचालकाला आपण भारतात असलेल्या इराण दूतावासाला याबाबत पत्र लिहण्यासाठी सांगितले असून गोविंद लवकरच सुरक्षीत गोव्यात परतणार असा विश्वास सावईकर यांनी व्यक्त केला.
इराणात जप्त करण्यात आलेल्या त्या ब्रिटीश जहाजावर गोमंतकीय अभियंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 6:20 PM
जहाजावर एकूण २३ अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ठळक मुद्देमागच्या शुक्रवारी एका ब्रिटीश जहाज इराणाच्या समुद्रातून जात असताना ह्या जहाजाला ‘इराणी ट्रुप्स’ ने जप्त केले होते.लवकरच भारतीय दूतावास इराणच्या दूतावासाशी संपर्क करून याच्यावर असलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी चर्चा करणार अशी माहीती सूत्रांकडून मिळाली आहे.