पणजी - दयानंद बांदोडकर चषक फुटबॉल स्पर्धेचा सुवर्ण चषक सुवर्णाचा म्हणजेच सोन्याचा राहिला नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आमदार चर्चिल आलेमाव यांनी लक्षवेधी सूचना करुन विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. 1999 साली 20 लाख रुपये किंमत असलेल्या या चषकाला आता केवळ सोन्याचा लेप लावण्यात येत असल्याचे गोवा फुटबॉल असोसिएशनतर्फे प्रसिद्ध केलेल्या ग्रीन ग्रास या पुस्तकात म्हटले आहे. या उल्लेखामुळे फुटबॉलप्रेमी अस्वस्थ झाले आहेत. याप्रकरणी सरकारने तात्काळ चौकशी करून सत्य बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी केली.
विधानभवनातील बांदोडकर चषकप्रश्नी विचारलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी चर्चील यांच्याशी सहमती दर्शविली. तसेच हे गंभीर प्रकरण असल्याचे सांगितले. ज्या अर्थाने असोसिएशन हा चषक बँक लॉकरमध्ये ठेवत आहे, त्या अर्थाने हा चषक पूर्ण सोन्याचाच असला पाहिजे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बांदोडकर यांनी हा चषक जेव्हा दिला तेव्हा त्याला कडक सुरक्षा देण्यात आली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली. या चषकाला हात लावायचे दूरच पण पहायलाही फार कष्ट घ्यावे लागत होते, असेही चर्चील यांनी सांगितले. लुईझीन फालेरो यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, क्रीडामंत्र्यांनी चौकशी केली जाईल, असे सांगितले असले तरी नेमकी कोणत्या प्रकारची चौकशी होईल हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे ही सभागृह समितीची चौकशी, न्यायालयीन चौकशी, मुख्यसचीवस्तरीय चौकशी की पोलीस चौकशी याबाबतचे गूढ कायम राहिले आहे.