वास्को: पहाटे दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘इंडिगो’ विमानातील एका प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३३ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. त्या प्रवाशाने ६१० ग्राम तस्करीचे सोने द्रव्य पद्धतीने थैलीत (पाऊच) लवपून आणल्याबरोबरच अन्य दोन २११ ग्राम वजनाच्या सोन्याच्या सरपळी आणल्या असून येथून तो चकमा देऊन पोबारा काढण्याच्या प्रयत्नात होता, मात्र सतर्क कस्टम अधिकाऱ्यांमुळे त्याचा हा बेत फसला. कस्टम अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाकडून एकूण ८२१ ग्राम तस्करीचे सोने जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध कस्टम कायद्याखाली कारवाई करत त्याला अटक केली.शनिवारी पहाटे दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने ही कारवाई केली. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या विमानातील प्रवाशांची तपासणी चालू असताना कस्टम अधिकाऱ्यांना एका पुरूष प्रवाशावर त्याच्या हालचालीवरून दाट संशय निर्माण झाला. यावेळी येथे उपस्थित कस्टम विभागाच्या सहाय्यक आयुक्त जुलीयेट फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिकाऱ्यांनी संशय निर्माण झालेल्या त्या प्रवाशाला बाजूला घेऊन त्याच्याशी कसून चौकशी करण्यास सुरवात केली. तसेच त्याची झडती घेतली असता त्यांने घातलेल्या अंतवस्त्रात तस्करीचे सोने लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कस्टम अधिकाºयांनी त्याप्रवाशाकडून थैलीत लपवून द्रव्य पद्धतीने आणलेले ६१० ग्राम सोन्यासहीत अन्य दोन सोन्याच्या सरपळी (एक ९८ ग्राम तर दुसरी ११३ ग्राम) पंचनामा करून जप्त केल्या. त्या प्रवाशाकडून जप्त केलेल्या तस्करीच्या सोन्याची एकूण किंमत ३३ लाख ६ हजार ९७ रुपये असल्याची माहिती कस्टम विभागातील सूत्रांनी दिली. तसेच कस्टम कायद्याखाली त्या प्रवाशाला अटक करण्यात आलेली असल्याची माहिती प्राप्त झालेली असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अजूनपर्यंत दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने जप्त केले १ कोटी ४४ लाख रुपयांचे तस्करीचे सोनेदाबोळी विमानतळावर १ एप्रिल २०२० ते अजूनपर्यंत (या आर्थिक वर्षात) कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत ३ कीलो ३३६ ग्राम तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहीती कस्टम विभागाचे आयुक्त मिहीर रंजन यांनी दिली. जप्त केलेल्या या तस्करीच्या सोन्याची एकूण किंमत १ कोटी ४४ लाख रुपये असल्याची माहीती त्यांच्याकडून प्राप्त झाली.
गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दूबईहून आलेल्या प्रवाशाकडून ३३ लाखांचे तस्करीचे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 11:29 PM