म्हापसा - गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला लाभलेल्या या संधीचा फायदा उठवण्याची गरज सध्या आहे. त्या ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरवणे पक्षाला गरजेचे आहे.
१९६३ ते २०१७ पर्यंत १३ विधानसभेच्या निवडणुका म्हापसा मतदारसंघातून घेण्यात आल्या. त्यात सातवेळा मगोचे, चार वेळा भाजपाचे तर दर एकावेळी काँग्रेस (अर्स) व राजीव काँग्रेसचे उमेदवार येथून निवडून आले आहेत. यात एकदा राजीव काँग्रेसचे आमदार म्हणून फ्रान्सिस डिसोझा पहिल्यांदाच निवडून आले होते. या दोन निवडणुका सोडल्यास या मतदारसंघावर मगो व भाजपाने अधिकार गाजवला आहे. एकूण १३ निवडणुकांतील पाच वेळा फ्रान्सिस डिसोझा यांनी तर तीनवेळा प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र एकदाही या मतदारसंघाने काँग्रेसला हात दिला नाही.
सध्या बाबूशनंतर काँग्रेसला त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. मात्र उमेदवारी कोणाला लाभणार यावरुन सर्व काही अवलंबून राहणार आहे. सध्या पक्षाकडून तीन उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नावेही चर्चेत आहेत. यात उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, पक्षाचे जेष्ठ उपाध्यक्ष डॉ. गुरुदास नाटेकर तसेच आर्मिन ब्रागांझा यांचा समावेश आहे. अलिकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री अडॅ. रमाकांत खलप यांचे पूत्र आश्वीन खलप व स्नुषा श्रद्धा खलप यांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेले आहे. या इच्छुकातील सर्वांनी यापूर्वी म्हापसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ब्रागांझा यानी फक्त एकदाच निवडणूक लढवली होती तर भिके व नाटेकर यांनी प्रत्येकी दोन वेळा निवडणूक लढवलेली. २०१७ च्या निवडणुकीत भिके हे बाबूश यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात होते. त्यांनी अंदाजीत ३०१३ मते प्राप्त झाली होती.
मतदारसंघात काँग्रेस पक्ष म्हणावा तसा सक्षम नसल्याचे दिसून आले असले तरी मागील काही महिन्यांपासून या पक्षाने आपल्या कार्याला बरीच गती दिली होती. भाजपा तसेच सरकाराच्या विरोधातील नेत्यांना एकत्रित आणण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी आपण म्हापशातून निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील नेते सुद्धा जोमाने कामाला लागले आहेत. फक्त पक्ष कोणाला उमेदवारी देतो यावर सर्व काही अवलंबून आहे.
म्हापशातून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यावर पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल असे विजय भिके म्हणाले. मात्र उमेदवारी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच देण्यात येणार असून आयात उमेदवाराला स्थान दिले जाणार नाही. मागील निवडणुका पासून या मतदारसंघात पक्षाने केलेल्या कार्याचा निवडणुकीत नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचे ते म्हणाले.