पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या (गोमेकॉ) हृदयरोगविषयक उपचार विभागाचे खासगीकरण करण्याचा घाट भाजपाशी संबंधित काही मंडळींकडून घातला जात आहे, असा संशय गोवा फॉरवर्ड पक्षाने व्यक्त केला आहे. खासगीकरणाची योजना सरकारने पुढे नेली तर त्याविरुद्ध आंदोलन छेडू, असा इशारा गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते दुर्गादास कामत व तन्वीर खतिब यांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. गोमेकॉच्या विविध विभागांमध्ये आमच्याशी संपर्क असलेली माणसे असून त्यांच्याकडून आम्हाला सगळी माहिती मिळते. भाजपशी संबंधित असलेले एक डॉक्टर आणि एका माजी डीनने मिळून गोमेकॉतील हृदयरोगविषयक उपचार विभागाचे प्रथम खासगीकरण करूया, असा प्रस्ताव आणला आहे. हा विषय उपमुख्यमंत्री तथा आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यापर्यंतही पोहोचला आहे. आम्ही याबाबत जनतेला सतर्क करत आहोत. सरकारचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे कामत म्हणाले. डिसोझा यांना जर गोमेकॉ व आरोग्य खाते चालवायला जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले. स्तनांच्या कर्करोगाची चाचणी करण्यासाठी मेमोग्राफी यंत्रणा असलेले वाहन यापूर्वीच्या सरकारने आणले होते. ते वाहन यंत्रसामग्रीसह धूळ खात पडले आहे. १०८ रुग्णवाहिका गोमेकॉ इस्पितळाच्या बाहेर तशाच पडून असून त्यांची दुरवस्था झाली आहे. एखाद्या ठिकाणी अपघात झाला तरी, रुग्णवाहिका लवकर पोहोचत नाहीत. गोमेकॉवर सरकारने प्रशासक नेमला पण या प्रशासकाचे कार्यालय पर्वरीच्या सचिवालयात आहे. इस्पितळ बांबोळीला व प्रशासक पर्वरीत, अशी स्थिती आहे. यावरून सरकार जनतेच्या आरोग्याविषयी गंभीर नसल्याचे दिसून येते, असे तन्वीर खतीब म्हणाले. सरकारने त्वरित प्रशासकांचे कार्यालय बांबोळीला हलवावे, कारण इस्पितळातील समस्यांबाबत लोकांना ते त्वरित उपलब्ध व्हायला हवेत. एन. डी. अगरवाल यांनी गोमेकॉबाबत सादर केलेला अंतरिम चौकशी अहवाल सरकारने जाहीर करावा, तसेच येत्या अधिवेशनात मांडावा, अशीही मागणी खतीब यांनी केली. गोमेकॉतील एका विभागात अन्य रुग्णांसोबत एका व्यक्तीचा मृतदेह पाच ते सहा तास तसाच ठेवण्याचा प्रकार घडला. लिफ्ट चालत नसल्याने कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह रुग्णांसोबतच सहा तास ठेवण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे खतीब म्हणाले. दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्ष लवकरच विविध भागांत आपले गट अध्यक्ष जाहीर करील, असे कामत यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
गोमेकॉच्या खासगीकरणाचा घाट
By admin | Published: June 22, 2016 1:54 AM