- किशोर कुबल
पणजी : गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. उपाध्यक्षांकडे त्यांनी आपले त्यागपत्र पाठवले आहे. 'लोकमत'ने आमोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. "मी माझ्या व्यवसायात व्यस्त असल्याने अकादमीच्या कामाला वेळ देऊ शकत नाही तसेच नवीन योग्य अशा उमेदवारास अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून मी राजीनामा देत आहे", असे त्यांनी सांगितले.
आमोणकर यांनी पुढे असेही नमूद केले की, कार्यकारिणीने संपूर्ण विश्वास व पूर्ण सहकार्य केल्यामुळेच मराठी भवनची बरीच कामे आम्ही मार्गी लावू शकलो. आमच्या कार्यकाळात फक्त रंगरंगोटीच नाही तर मराठी भवन वास्तूची बरीच डागडूजीही केली. कोमूनिदाद जागेचे “फोर”चे पैसे स्वीकारत नव्हते आम्ही प्रयत्न करुन कार्यकारिणीला आमचे 'फोर'चे पैसे घ्यायला लावले व 'नो ड्यू सर्टीफीकेट' पण द्यायला लावली.
दुसरी बाब म्हणजे इमारतीचा परवाना २००२ सालीच संपला होता. या परवान्याच्या नुतनीकरणाला सुरवातीला स्थानिक पंचायतीने पत्र पाठवून विरोध केला होता व फेरपरवान्यासाठी नगर नियोजन मंडळाकडे नवीन अर्ज व नवीन आराखडा तयार करायला सांगतले होते व या कामासाठी आजच्या घडीला कमीत कमी ६० ते ६५ लाख रुपये परवाना फी भरावी लागली असती. आम्ही प्रयत्न करुन ५ लाख रुपयांपेक्षाही कमी खर्चात नूतनीकरण करुन घेतले.
सर्वात महत्वाचे म्हणजे संस्था नोंदणी नूतनीकरण २००७ पासून रखडले होते व सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकले नसते. हे काम करुन घेतले. वरील कामे करताना अकादमीच्या पैशाने कधीच कुणाला लांच वगैरे दिली नाही अथवा कुठल्याही सदस्याने एक रुपयादेखील जेवणासाठी किंवा इंधन खर्चासाठी घेतला नाही. अध्यक्ष या नात्याने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवले. अकादमीचे वाचनालय व कार्यालय परत लोकांसाठी सुरू केले. मला एकच मोठी खंत सतावत होती ती म्हणजे मी माझ्या कार्यकाळात अकादमीचे खास काही कार्यक्रम करू शकलो नाही.
राजीनामापत्र सादर केल्यानंतर आमोणकर यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त करताना असे म्हटले आहे की, 'ज्याला अकादमीसाठी वेळ देता येईल व कोणावरही अवलंबून न राहता चांगल्या प्रकारे लिहिता व वाचता येते अशाच व्यक्तिने या पदावर राहायला हवे. शेवटी त्यांनी मराठी अकादमीचा सदस्य व नंतर अध्यक्ष म्हणून सेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्वांचे व खास करून नरेंद्र आजगावकर यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, आपला राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही, असे आमोणकर यांनी 'लोकमत'ला सांगितले. ते म्हणाले की, हा आमचा अंतर्गत मामला आहे. नवीन अध्यक्षाची निवड झाल्यानंतर मी नव्या अध्यक्षासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे.