- नारायण गावस
पणजी: राज्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून लाेकांना उष्मा आता असाहाय्य झाला आहे. प्रत्येकजण या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत आहेत. हवामान खात्यानुसार यंदाचा एप्रिल महिन्यात उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आरोग्य खात्याने जनतेला काही सूचना जाहीर केल्या आहेत.
नाक्यानाक्यावर शहाळे लिंबू विक्रेते प्रत्येकजण या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लिंबू पाणी तसेच शहाळ्यांच्या पाण्याचे सेवन करत आहेत. त्यामुळे आता शहरापासून गावागावात ठिकठिकाणी शहाळे विक्रेते तसेच लिंबू सरबत करणारे विक्रेते दिसत आहेत. तसेच उसाच्या रसालाही मागणी वाढली आहे. लोकांनी आता चहा कॉफीचे सेवत कमी केल्याने अशा थंडपेयांना मागणी वाढली आहे. तसेच आता शीतपेय लोक कमी पीत आहेत. उन्हाळ्याचा बचावासाठी फळांचा रस उपयोगी ठरत आहे. त्यामुळे आता लिंबू, कोकम, कलिंगण, शहाळे, यांच्या किमती वाढलेल्या आहे.
कौलारूच घरे चांगली म्हणण्याची आली वेळआता विकासाच्या नावाखाली लोकांनी कौलारू घरे पाडून काँक्रेटची घरे बांधली पण यात हाेत असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे अशा कॉँक्रेटच्या घरामध्ये राहणे लोकांना कठोर शिक्षेप्रमाणे प्रमाणे झाले आहे. एसी शिवाय या घरात राहणे अशक्य आहे. त्यामुळे सध्या एसींनाही मागणी वाढली आहे. बहुतांश लाेकांनी कौलारू घरे माेडन दिखाव्यासाठी माेठी कॉँक्रेटची घरे बांधली आहे. पण हात असलेली प्रचंड उष्णता पाहून लोकांना कौलारूच घरे चांगली हाेती म्हणण्याची वेळ आली आहे.
लोकांची पसंती फार्महाऊसनावाढत्या उष्णतेमुळे आता बहुतांश लाेक आपली आठवड्याची सट्टी फार्महाऊसवर घालवत आहे. निसर्गाच्या अशा या ठिकाणी सुट्टीचा लाेक आनंद घेत आहेत. समुद्र किनारी सध्या प्रचंड उष्णता होत असल्याने ग्रामिण भागातील फार्महाऊसना आता मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश पर्यटक सत्तरी, फाेंडा, काणकोण, केपे, सांगे, या ग्रामीण तालुक्यामधील फार्महाऊसमध्ये जात आहेत.