लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोमंतकीयांचा काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. राज्यात विरोधक आहेत; परंतु विरोधकांमध्ये एकी नाही, अशी टिप्पणी गोवा फारवर्डचे आमदार विजय सरदेसाई एका मुलाखतीदरम्यान केली.
लोकसभा निवडणुकीसाठी तरी विरोधी पक्ष एकत्र येणार का, असा प्रश्न केला असता सरदेसाई म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मी टीम गोवाबद्दल बोलत होतो. परंतु आता ते बोलणेही बंद केले आहे. परिस्थितीत सुधारणा होईल अशी चिन्हे नाहीत. विरोधकांनी 'एकला चलो रे'ची भाषा केल्यावर एकी शक्यच नाही. गोव्यात लोकांचा काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. काँग्रेससाठी आमदार निवडून द्यायचे व या आमदारांनी मग पक्षांतर करायचे असे चालले आहे. देशपातळीवर सर्व विरोधक 'इंडिया'च्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत. 'इंडिया' ही विरोधकांची युती गोव्यात कधी पोहोचते, याची प्रतीक्षा मी करतोय. त्यानंतरच मी अधिक बोलू शकेन, असे ते म्हणाले.
सरदेसाई यांनी असा आरोप केला की, गोव्याच्या इतिहासात कधीही नव्हते एवढे भ्रष्ट सरकार सध्या राज्यात सत्तेवर आहे. राज्यातील सुसंस्कृत जनतेला याची कल्पना आहे.